भुसावळात पठाणकोट एक्स्प्रेसमधून अडीच लाखांचा गुटखा जप्त
तस्करी पुन्हा ऐरणीवर : बर्हाणपूरच्या आरोपीला अटक ; गुटख्याची मनमाड-मुंबईदरम्यान तस्करीचा संशय
Gutkha worth ₹2.5 Lakhs seized from Pathankot Express in Bhusawal. भुसावळ (24 मार्च 2026) : राज्यात प्रतिबंधीत असलेल्या गुटख्याची पठाणकोट एक्स्प्रेसद्वारे भुसावळहून मनमाड-मुंबईदरम्यान कुठेतरी तस्करी होणार असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा यंत्रणांना मिळाल्यानंतर संयुक्त कारवाई करीत यंत्रणेने बर्हाणपूरच्या आरोपीला बेड्या ठोकल्या व आरोपीकडील 17 बॅगांमधील दोन लाख 53 हजार 506 रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला. आरोपीच्या अटकेनंतर गुटख्याची तस्करी करणारे रॅकेट समोर येण्याची शक्यता आहे. सुनील शिवनारायण मालाकार (42, शिवाजीनगर, लालबाग, बर्हाणपूर, मध्यप्रदेश) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
अप 11058 पठाणकोट एक्स्प्रेसमधून एक संशयीत मोठ्या प्रमाणावर गुटखा भुसावळ येथून मनमाड-मुंबईदरम्यान नेत असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाला मिळाल्यानंतर लोहमार्ग पोलिसांना याबाबत कल्पना देण्यात आली. लोहमार्गचे निरीक्षक सुधीर धायरकर यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ लोहमार्गचे हवालदार विजयसिंग चव्हाण, धनराज लुले, चव्हाण, जाधव, मिर्झा तसेच आरपीएफ एएसआय दीपक कवले, आरक्षक नरेंद्र कुमार गौतम, कपिलकुमार आदींच्या पथकाने सोमवार, 23 रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पठाणकोट एक्स्प्रेस प्लॅटफार्म क्रमांक चारवर आल्यानंतर इंजिनाजवळील जनरल डब्याची झडती घेतल्यानंतर त्यांना 17 मोठ्या बॅगा संशयास्पद आढळल्यानंतर त्यांची तपासणी केली असता त्यात गुटखा आढळल्याने प्रवाशांना विचारणा केल्यानंतर त्यांनी या बॅगा संशयीत सुनील शिवनारायण मालाकार (42, शिवाजीनगर, लालबाग, बर्हाणपूर, मध्यप्रदेश) च्या असल्याचे सांगितल्यानंतर त्यास ताब्यात घेण्यात आले.

अडीच लाखांचा गुटखा जप्त
आरोपी सुनीलच्या ताब्यातून भल्या मोठ्या तब्बल 17 बॅगा जप्त करण्यात आल्या. या बॅगांमध्ये प्रीमीयम रजनीगंधा, प्रीमीयम डिरेक्टर स्पेशल, जाफराणी जर्दा, विमल पानमसाला, व्ही 1 टोबॅको आदी प्रकारचा दोन लाख 53 हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधीत गुटखा जप्त करण्यात आला. लोहमार्गचे हवालदार महेश धनराज पराते (रेल्वे वसाहत, भुसावळ) यांच्या फिर्यादीवरुन आरोपी सुनील शिवनारायण मालाकार (42, शिवाजीनगर, लालबाग, बर्हाणपूर, मध्यप्रदेश) विरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली.
तस्करी उघड होणार : आरोपीला तीन दिवसांची कोठडी
रेल्वेद्वारे गुटख्याची तस्करी होत असल्याच्या गोपनीय माहितीवरून संयुक्त कारवाई करण्यात आली. आरोपीला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून कोठडीत रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे. आरोपीच्या हाताचे ठसेदेखील घेण्यात आले असून बर्हाणपूरहून घेतलेला गुटखा मनमाड-मुंबईदरम्यान कुठेतरी विक्री करण्याच्या उद्देशाने नेला जात असावा, असे पोलिस निरीक्षक सुधीर धायरकर म्हणाले.




