50 हजारांची लाच भोवली : अमळनेर तालुक्यातील लाचखोर ग्रामपंचायत अधिकारी जळगाव एसीबीच्या जाळ्यात
गणेश वाघ
भुसावळ (30 एप्रिल 2026) : बारा लाख रुपयांचे बिल मंजूर केल्याच्या मोबदल्यात सात टक्के प्रमाणे एकूण 84 हजार रुपयांची लाच मागून तडजोडीअंती 50 हजारांची लाचा स्वीकारताना अमळनेर तालुक्यातील नगाव बुद्रुक येथील ग्रामपंचायत येथील ग्राम विकास अधिकारी रवींद्र देविदास पवार (48) यांना जळगाव एसीबीने गुरुवारी सायंकाळी राहत्या घरातून अटक केल्याने लाचखोर प्रचंड हादरले आहेत.
असे आहे लाच प्रकरण
तक्रारदाराच्या नातलगाला पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून नगाव बुद्रुक येथे सिमेंट काँक्रीट गटार बांधकाम आणि पेव्हर ब्लॉक बसविण्याची दोन स्वतंत्र कामे मंजूर झाली होती. या दोन्ही कामांची एकत्रीत अंदाजित किंमत सुमारे 12 लाख रुपये इतकी होती. ही कामे पूर्ण करून त्यांची बिले मंजूर करून देण्यासाठी ग्रामविकास अधिकारी पवार यांच्याकडून तक्रारदाराकडे एकूण कामाच्या रकमेच्या सुमारे 7 टक्के प्रमाणे 84 हजारांची मागणी केली मात्र तक्रारदाराने आर्थिक अडचणी दर्शविल्यानंतर दोघांमध्ये तडजोड होऊन 50 हजार रुपये देण्याचे ठरले.



एसीबीकडे तक्रार अन् आरोपी जाळ्यात
तक्रारदाराने ही बाब गांभीर्याने घेत गुरुवार, 30 एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगावकडे अधिकृत तक्रार नोंदवली. तक्रारीनंतर विभागाने प्राथमिक पडताळणी केली असता संशयिताकडून लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर नियोजनपूर्वक सापळा रचून पंचांच्या उपस्थितीत आरोपीला राहत्या घरी लाच स्वीकारताच बेड्या ठोकण्यात आल्या.
यांनी केला सापळा यशस्वी
जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, बाळू मराठे, किशोर महाजन, सुनील वानखेडे, भूषण पाटील, मनोज पाटील प्रणेश ठाकूर, अमोल सूर्यवंशी सचिन साठे आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.
