एस.आय.टी.चौकशीनंतर रुपाली चाकणकर म्हणाल्या ; अध्यात्मिक श्रद्धेपोटी खरातांना गुरू मानले ; दुसरी बाजू माहीत नव्हती


पुणे (11 मे 2026) : एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी रुपाली चाकणकर यांची तब्बल सहा तास स्वतः नाशिकमध्ये एस.आय.टी.चौकशी केली. या चौकशीत चाकणकर काय म्हणाल्यात याचा तपशील समोर आला आहे. मी अशोक खरातला आध्यात्मिक श्रद्धेपोटी गुरू मानले होते मात्र त्याची दुसरी बाजू मला माहीत नव्हती, असा दावा रुपाली चाककर यांनी एसआयटी चौकशीत केल्याचे सूत्रांनी सांगितले.

महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर असताना रूपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर तेजस्वी सातपुते यांनी त्यांना अनेक रोखठोक सवाल विचारले.



प्रश्नांची चाकणकरांवर सरबत्ती
भोंदू अशोक खरात याला तुम्ही कधीपासून ओळखता?

’शिवनिका’ संस्थेवर असताना तुम्हाला त्याच्या गैरप्रकारांची कल्पना होती का?

खरातसोबत केलेले पूजा-विधी नेमके कशासाठी होते? तसेच सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो आणि व्हिडीओ नेमके कोणत्या कार्यक्रमांमधील आहेत?

धार्मिक विधींच्या नावाखाली खरातसोबत तुमचे काही आर्थिक व्यवहार झाले होते का?

खरातशी संबंधित व्यवहार कोणत्या बँक खात्यांतून पार पडले?

खरातच्या मंदिरात येणारे इतर राजकीय नेते कोणाच्या सांगण्यावरून येत होते?

खरातची दुसरी बाजू माहीत नव्हती : चाकणकर
चौकशीदरम्यान रूपाली चाकणकर यांनी आपली बाजू मांडताना खरातसोबतचे संबंध केवळ ‘आध्यात्मिक’ असल्याचा दावा केला. त्या म्हणाल्या, आमचे कुटुंब वारकरी संप्रदायाचे आहे त्यामुळे आम्ही केवळ अध्यात्मिक श्रद्धेपोटी अशोक खरात आणि त्याच्या पत्नीला ‘गुरू’ मानले होते. खरातच्या काळबाजाची मला कोणतीही कल्पना नव्हती. माझे त्याच्याशी कोणतेही आर्थिक संबंध नाहीत तसेच मी कोणालाही त्याच्याकडे जाण्याचा आग्रह धरला नाही.

तपासात पूर्ण सहकार्याचे आश्वासन
सहा तासांच्या चौकशीनंतर माध्यमांशी बोलताना चाकणकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. पोलिसांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची मी समर्पक उत्तरे दिली आहेत. तपासात पोलिसांना जे काही सहकार्य लागेल, ते मी पूर्णपणे करेन. चौकशीचा सविस्तर अहवाल लवकरच समोर येईल, असे त्यांनी नमूद केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !