जळगावातील गुंतवणूकदारांना 24 कोटींचा गंडा : आरोपी मिलिंद पाटीलची पोलीस कोठडीत रवानगी
ब्रँच मॅनेजर, एजंटांसह कंपनीच्या संचालक गुन्हे शाखेच्या रडारवर : कारवाईने गुंतवणूकदारांमध्ये समाधान
Jalgaon Investors Swindled Out of ₹24 Crore: Accused Milind Patil Remanded to Police Custody भुसावळ (15 मे 2026) : गुंतवणूकदारांना जास्त परताव्याचे आमिष दाखवून जळगावातील 279 गुंतवणूकदारांची तब्बल 24 कोटी रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणी टीडब्ल्यूजे असोसिएट्स प्रा. लि. कंपनीचे संचालक, ब्रँच मॅनेजर व एजंटांविरोधात जळगावात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुंतवणूकदारांचे पैसे स्वीकारून रग्गड कमिशन स्वीकारून हात वर करणार्या जळगावच्या मिलिंद पाटीलला जळगाव गुन्हे शाखेने अटक करीत न्यायालयात हजर केले असता 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
असे आहे फसवणूक प्रकरण
भरत रतीलाल पवार (पाळधी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, टीडब्ल्यूजे असोसिएट्स प्रा. लि., पुणे या कंपनीच्या पदाधिकार्यांनी गुंतवणूकदारांना शेअर मार्केट ट्रेडिंगमधून मोठा नफा मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी विविध ठिकाणी सेमिनार घेऊन लोकांना आकर्षित करण्यात आले. गुंतवणूक केल्यास दरमहा अधिक परतावा मिळेल, अशी हमी देत अनेकांकडून रक्कम जमा करण्यात आली.






24 कोटींचा घातला गंडा
तक्रारीनुसार डिसेंबर 2020 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत तब्बल 279 गुंतवणूकदारांकडून सुमारे 23 कोटी 81 लाख 72 हजार 530 रुपये जमा करण्यात आले मात्र मुदत पूर्ण झाल्यानंतरही गुंतवणूकदारांना परतावा न देता त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली.
या प्रकरणी टीडब्ल्यूजे असोसिएटचे प्रा.लि.चे संचालक समीर सुभाष नार्वेकर, नेहा समीर नार्वेकर, टीडब्ल्यूजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्रा.लि.चे संचालक संकेश रामकृष्ण घाग, टीडब्ल्यूजे असोसिएट जळगाव शाखेचे मिलिंद शालिकराव पाटील (जळगाव) व इतर संचालक, एजंटांनी शेअर मार्केट ट्रेडींगची माहिती देवून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
जळगावच्या आरोपीला अटक
गुंतवणूक दारांकडून रक्कम स्वीकारण्यात महत्त्वाची भूमिका निभावणार्या जळगावच्या मिलिंद पाटीलला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर त्यास न्यायालयाने 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, या गुन्ह्यातील संशयीत आरोपी समीर नार्वेकर व पत्नी नेहा समीर नार्वेकर यांना 30 जानेवारी 2026 रोजी धंतोली, नागपूर शहर पोलिसांनी अटक केली असून त्यांचा ताबा लवकरच जळगाव आर्थिक गुन्हे शाखा घेणार आहे.
जळगावातील गुन्ह्याचा तपास प्रभारी उपअधीक्षक संदीप पाटील, एपीआय गणेश फड, हवालदार रवींद्र परदेशी, विकास पहूरकर आदी करीत आहेत.


