जळगावात प्रेम प्रकरणानंतर तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या
Young Man Commits Suicide Under Train in Jalgaon Following Love Affair जळगाव (16 मे 2026) : प्रेमप्रकरणातून घर सोडून गेलेल्या जळगाव तालुक्यातील एका गावातील 19 वर्षीय तरुणाने जळगाव रेल्वे स्थानकाजवळ धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना, शुक्रवार, 15 मे रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. गणेश गुरुप्रसाद सोनवणे (19, जळगाव तालुका) असे मृत तरुणाचे नाव आहे.
आईला केला अखेरचा कॉल
विशेष म्हणजे, आत्महत्या करण्यापूर्वी आणि मृत्यूनंतर पोलीस येईपर्यंत या तरुणाचा आईसोबतचा कॉल सुरू होता, त्यात तुझ्या मुलासोबत बोलण्याची ही शेवटची वेळ आहे, आता राहणार नाही तुझा मुलगा, फार मोठी चूक करीत आहे मी, असे तरुणाने म्हणत रेल्वेखाली झोकून दिले. हा प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाला आहे.
4 मे पासून दोघे बेपत्ता
गणेश गुरुप्रसाद सोनवणेचे गावातीलच एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. हे दोघेही 4 मे पासून घरातून निघून गेले होते. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात त्यांच्या बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती. शुक्रवार, 15 मे रोजी सकाळी जळगाव रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर दोघांनीही आपल्या नातेवाईकांना फोन करून आपण जळगावला आल्याची माहिती दिली. त्यानंतर तरुणीचा भाऊ जळगाव रेल्वेस्थानकावर येवून तिला घेऊन गेला.
आईशी शेवटचा संवाद आणि मृत्यू
तरुणीला तिचे नातेवाईक घेऊन गेल्यानंतर गणेशने आपल्या आईला शेवटचा फोन केला व छत्रपती शिवाजी नगर रेल्वे उड्डाणपुलाजवळ धावत्या रेल्वेखाली उडी घेतली. धक्कादायक बाब म्हणजे, उडी घेतल्यानंतरही त्याचा फोन सुरूच होता. रेल्वे पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले, तेव्हा त्यांनी मोबाईल उचलला असता पलीकडून त्याची आई बोलत असल्याचे समोर आले.









