दुहेरी हत्याकांडाने साक्री तालुका हादरला : पूजाविधीसाठी आलेल्या महिलेसह तरुणाची हत्या

अवघ्या दोन तासांत गुन्ह्याची उकल : संशयित आरोपी योगेश खैरनार निजामपूर पोलिसांच्या ताब्यात


Sakri Taluka Rocked by Double Murder: Woman and Youth Murdered While Visiting for Rituals साक्री, जि.धुळे (16 मे 2026) : सातत्याने येत असलेल्या अडचणी मिटवण्यासाठी महिला परिचितासह मांत्रिकाकडे आली व पूजा विधीनंतर महिलेला सोडण्यासाठी स्वतः मांत्रिक निघाला मात्र रस्त्यातच त्याचे नियत फिरवल्याने त्याने महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याने महिलेने त्यास नकार दिल्यानंतर आरोपीने तिचा गळा आवळून खून केला तर महिला घरी पोहोचली का? म्हणून महिलेच्या परिचिताने जाब विचारल्यानंतर खुनाचे बिंग फुटेल या भीतीने मांत्रिकाने संबंधित तरुणाचादेखील खून केला. साक्री तालुक्यात निजामपूर हद्दीत शनिवार, 16 रोजी झालेल्या दुहेरी हत्याकांडाने धुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली.

जयश्री रजनीकांत काकुस्ते (हिरे) (रा.कासारे, ता.साक्री) व अक्षय गंगाधर सोनवणे (जैताणे, ता.साक्री) अशी खून झालेल्यांची नावे असून योगेश बापू खैरनार (जैताणे, ता.साक्री) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. अवघ्या दोन तासात पोलीस यंत्रणेने दुहेरी हत्याकांडाची उकल केली.

काय आहे नेमके प्रकरण ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार, 16 मे रोजी रायपूर ते वरधाने रस्त्यालगत सुझुकी अ‍ॅक्सेस दुचाकी (एम.एच.18 सी.एच.8151) जवळ महिलेचा मृतदेह आढळून आला होता. याबाबत माहिती मिळताच निजामपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाशेजारी मिळालेल्या मोबाईलच्या आधारे मृत महिलेची ओळख जयश्री रजनीकांत काकुस्ते (हिरे), रा. कासारे ता. साक्री अशी पटली. तपासादरम्यान संबंधित महिला पूजा विधीसाठी जैताणे शिवारात गेल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पोलिसांनी गोपनीय व तांत्रिक तपास सुरू केला.

दोन तासात दुहेरी हत्याकांडाची उकल
या तपासात संशयित म्हणून योगेश बापू खैरनार (जैताणे, ता.साक्री) याला ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला मात्र सखोल चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपीने पोलिसांना सांगितले की, मृत महिला जयश्री काकुस्ते व तिचा मित्र अक्षय गंगाधर सोनवणे (रा.जैताणे) हे पूजा विधीसाठी त्याच्याकडे आले होते. पूजा झाल्यानंतर महिलेस घरी सोडण्यासाठी जात असताना आरोपीने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. महिलेने प्रतिकार करून आरडाओरड केल्याने आरोपीने तिचा गळा आवळून खून केला.

त्यानंतर या घटनेबाबत विचारणा करणार्‍या अक्षय सोनवणे याचाही संशयित आरोपीने लोखंडी टॉमीने डोक्यावर व बरगड्यांवर वार करून खून केला तसेच पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जंगलातील काटेरी झुडपात टाकून जाळण्याचाही प्रयत्न केला होता. दरम्यान, पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवत आरोपीला ताब्यात घेत दुहेरी हत्याकांडाचा दोन तासात उलगडा केला. या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी उघडकीस आणला गुन्हा
हा गुन्हा धुळे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे, स्थानिक गुन्हे शाखचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय मयूर भामरे, गुन्हे शाखेचे एपीआय नामदेव सहारे, उपनिरीक्षक मधुकर सोमासे, पोलीस अंमलदार नारायण मालचे, रतन मोरे, दीपक महाले, पृथ्वीराज शिंदे, राकेश महाले, परमेश्वर चव्हाण, श्रीराम पदमर, कृष्णा भील, सुनील अहिरे, जितेंद्र साळुंखे, प्रवीण पवार, मुकेश दुरगुडे, सागर थाटशिंगारे, शरद पाटील, अशोक तावडे, गौतम अहिरे, मनोज देवरे, महिला पोलीस अंमलदार नम्रता मगर, स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार सदेसिंग चव्हाण, पंकज खैरमोडे, तुषार सुर्यवंशी, महेंद्र सपकाळ, अतुल निकम, योगेश जगताप आदींच्या पथकाने उघडकीस आणला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !