यावलला शहरात कार अडवून फोटोग्राफरला मारहाण : चार आरोपींना पोलिसांच्या बेड्या

चौघांना चार दिवसाची पोलिस कोठडी : कार फोडून, कॅमेरे लांबवल्याने दरोड्याचे कलम वाढवले : दोन अल्पवयीनांचा गुन्ह्यात सहभाग


Photographer Assaulted After Car Stopped in Yawal City: Four Accused Arrested by Police यावल (17 मे 2026): यावल शहरातून मार्गस्थ होणार्‍या अंकलेश्वर बर्‍हाणपूर राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी रात्री चारचाकी वाहन घेऊन जात असलेल्या फोटोग्राफरला दुचाकीस कट मारल्याच्या रागातून जबर मारहाण करण्यात आली होती. यावेळी संशयीतांनी फोटोग्राफीचे साहित्य लांबवत कारच्या काचा फोडल्या होत्या. या प्रकरणी यावल पोलिसांनी तब्बल 10 संशयीतांचा शोध घेतला असून त्यातील दोन अल्पवयीन सह जणांना शनिवारी ताब्यात घेण्यात आले. यातील दोन अल्पवयीन विधी संघर्षीत बालकांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले तर चार जणांना यावल न्यायालयात हजर केले असता त्यांना 19 मे पर्यंत चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. चार पसार असलेल्या संशयीतांचा शोध पोलीस घेत आहे.

काय घडले यावल शहरात ?
यावल शहरातून मार्गस्थ होणार्‍या अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राष्ट्रीय महा मार्गावर एचपी पेट्रोल पंपाच्या रोडवर अनिकेत नंदा जाधव (21, रा.मिलिंद नगर, जामखेड, ता.जामखेड, जि.अहिल्यानगर) हा फोटोग्राफर चारचाकी वाहन (क्रमांक एम.एच.04 ई.एक्स. 0811) व्दारे शहरात येत होता. दुचाकीस कट लागल्याच्या कारणावरून दोन जणांनी त्याच्याशी वाद घातला. अचानक त्या ठिकाणी 15 ते 20 जणांचा जमावदेखील चालून आला. यात तरुणास जबर मारहाण करण्यात आली तसेच चारचाकी वाहनाचे काच दगडाने फोडून फोटोग्राफीचे कॅमेरे व बॅग हे साहित्य लांबवण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन विधी संघर्षीत बालकांसह सैय्यद अलताफ सैय्यद मासुम, सैय्यद शहादत सैय्यद मासुम, शेख दानिश शेख युसूफ व शेख तन्वीर शेख भिखारी या सहा जणांना ताब्यात घेतले. यातील अल्पवयीन मुलांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. इतर चौघांना यावल न्यायालयात न्या.जी.आर.कोलते यांच्यासमोर हजर केले असता चौघांना 19 मेपर्यंत चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक अनिल महाजन करीत आहे.

दरोड्याचे कलम लावले : पसार संशयीतांचा शोध सुरू
या गुन्ह्यात फिर्यादीचे महागडे कॅमेरे चोरीला गेले आहे. या गुन्ह्यात थेट दरोड्याचे कलम लावण्यात आले आहे. या गुन्ह्यातील सैय्यद फैजान उर्फ पब्लीक सैय्यद मासुम, नव्या खान असलम खान,परवेश शेख नासिर मुल्ला व राशीद खान सुलतान खान अशा चार ओळख पटलेल्या संशयीतांचा शोध पोलीस घेत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !