गोदावरी नर्सिंगचे रजिस्ट्रार प्रवीण कोल्हे यांचा अपघाती मृत्यू
पिंपरूड फाट्याजवळ भीषण अपघात ; चार जण जखमी
Pravin Kolhe, Registrar at Godavari Nursing, Dies in Accident जळगाव (17 मे 2026) : गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे रजीस्ट्रार प्रवीण कोल्हे (48, रा.रोझोदा, ह.मु. जळगाव) हे भुसावळ येथील लग्नकार्य आटोपून मूळगावी रोझोदा येथे जातांना फैजपूरनजीक 14 रोजी मध्यरात्री 1.30 वाजेच्या सुमारास त्यांच्या वाहनाला अपघात झाला. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. उपचारासाठी त्यांना तातडीने डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात हलविण्यात आले मात्र उपचारादरम्यान शुक्रवार, 15 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. या अपघातात त्यांच्या परिवारातील पत्नी, मुलगी आणि आई हे तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
असा घडला अपघात
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे रजीस्ट्रार प्रवीण कोल्हे हे परिवारासह 13 मे रोजी भुसावळ येथे चुलत भावाच्या लग्नकार्यानिमीत्त कार (एम.एच.19 सी.व्ही.0624) ने गेले होते. गोरज मुहूर्ताचे लग्नकार्य आटोपून ते त्यांच्या मुळगावी रोझोदा येथे जाण्यासाठी निघाले असता पिंपरूड फाट्याजवळ त्यांची कार एका झाडावर जाऊन आदळली. या भीषण अपघातात प्रवीण कोल्हे हे गंभीररित्या जखमी झाले तर परिवारातील त्यांची आई उषा प्रल्हाद कोल्हे (69), पत्नी हर्षा प्रवीण कोल्हे ( 38), मुलगी निर्मीती प्रवीण कोल्हे (10) आणि वहिनी भावना नीलेश कोल्हे (41) हे जखमी झाले.
अपघातानंतर सर्व जखमींना उपचारासाठी डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात हलविण्यात आले होते. शुक्रवार, 15 मे रोजी उपचारादरम्यान प्रवीण कोल्हे यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे गोदावरी परिवारावर शोककळा पसरली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, दोन भाऊ असा परिवार आहे. प्रवीण कोल्हे यांच्या अपघातील मृत्यूबद्दल माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी शोक व्यक्त केला आहे. यासंदर्भात नशिराबाद पोलिसात नोंद घेण्यात आली असून फैैजपूर पोलीस ठाण्यात पंचनामा करण्यात आला.










