पुणे पुन्हा हादरले : आंदेकर टोळीकडून एकाची हत्या
मयत माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपीचा सख्खा भाऊ
Pune Shaken Again : One Murdered by Andekar Gang पुणे (20 मे 2026) : पुण्यातील टोळी युद्ध थांबायला तयार नाही, अशी स्थिती आहे. कोमकर व आंदेकर टोळीयुध्दातून पुन्हा एकाची हत्या करण्यात आली आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील संशयीत आरोपीच्या भावाची हत्या करण्यात आली आहे तर आंदेकर टोळीतील व्यक्तींनी हा गोळीबार केल्याची माहिती आहे. कोमकर आणि आंदेकर टोळीयुध्दातून ही चौथी हत्या घडल्याने पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे.
गोळ्या झाडून केली हत्या
मृत तरुणाचे नाव अक्षय बापू म्हस्के उर्फ बाळा (26, रा.आंबेगाव पठार, पुणे) असे आहे. हल्लेखोरांनी बालाजी नगरात दबा धरून अक्षयवर जवळून गोळ्या झाडल्या. त्याला तीन गोळ्या लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्यानंतर त्याच्या तोंडावर आणि डोक्यात धारदार कोयत्याने वारही करण्यात आले.



प्राथमिक माहितीनुसार, अक्षय म्हस्केवर यापूर्वी तीन वेळा जीवघेणे हल्ले झाले होते परंतु तो त्यातून बचावला होता मात्र चौथ्या हल्ल्यात हल्लेखोरांनी त्याचा खून केला. मृत अक्षय म्हस्के हा वनराज आंदेकर खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आकाश म्हस्के याचा सख्खा भाऊ आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येत आकाश म्हस्केने महत्त्वाची भूमिका बजावली होती. हत्येसाठी लागणारे पिस्तूल त्याने मध्य प्रदेशातून पुण्यात आणले होते.
आकाश म्हस्के हा वनराज आंदेकर खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सोमनाथ उर्फ सोमा गायकवाड याचा विश्वासू साथीदार मानला जातो. आंदेकर यांच्या हत्येचा कट रचण्यात, त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आणि ‘फिल्डिंग’ लावण्यात सोमा गायकवाड व आकाश म्हस्के यांचा सहभाग होता. त्यानंतर आंदेकरांवर गोळीबार करून कोयत्याने वार करत त्यांची हत्या करण्यात आली होती.
आकाश म्हस्के सध्या कारागृहात आहे. त्याच्या कृत्याचा सूड घेण्यासाठी आंदेकर टोळीच्या सदस्यांनी त्याचा भाऊ अक्षय म्हस्केला लक्ष्य केले असावे, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेमुळे पुणे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.






