बनावट टँगो पंच देशी दारुचा कारखाना उद्ध्वस्त : शिरपूर पोलिसांची कारवाई
तीन लाख दहा हजारांचा मुद्देमाल जप्त : बनावट दारू पुन्हा पोलिसांच्या ऐरणीवर
Illicit ‘Tango Punch’ Country Liquor Distillery Dismantled : Shirpur Police Action शिरपूर (22 मे 2026) : आरोग्यासाठी घातक असलेल्या रसायनांद्वारे बनावट टँगो पंच दारू बनवली जात असताना शिरपूर शहर पोलिसांनी गोपनीय माहितीद्वारे कारवाई करीत कारखाना उद्ध्वस्त केला. एका आरोपीला अटक करण्यात आली असून तीन लाख 10 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईने बनावट दारूचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शिरपूर शहर पोलिसांच्या डी.बी. पथकाने नवे चांदसुर्या परिसरात ही कारवाई केली.
गोपनीय माहितीवरुन कारवाई
शिरपूर शहर पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांना वासर्डी रोडवरील एका संशयित घरात बनावट दारू निर्मिती सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकासह छापेमारी केली. यावेळी नितेंद्र पोपटराव पावरा (38, रा.नवे चांदसुर्या) हा बनावट देशी दारू तयार करताना रंगेहाथ आढळून आला. पोलिसांनी घराची कसून झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात बनावट दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य आढळून आले.



तीन लाखांचा मुद्देमाल जप्त
पथकाने स्पिरीटने भरलेल्या टाक्या, हजारो रिकाम्या टँगो पंच प्लास्टिक बाटल्या, बुच, स्टिकर्स, सिलबंद दारूच्या बाटल्या, इलेक्ट्रिक सिलिंग मशीन तसेच इतर साहित्य जप्त केले. यावेळी 435 लिटर स्पिरीट, 22 हजार रिकाम्या बाटल्या, 90 सीलबंद बाटल्या, इलेक्ट्रिक सिलिंग मशीन स्टिकर्स, बुच, प्लास्टिक टाक्या, ट्रे व इतर साहित्य असा एकूण 3.10 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीला न्यायालयाने 22 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी, विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर निरीक्षक किशोरकुमार परदेशी, उपनिरीक्षक सुरेश सोनवणे, उपनिरीक्षक दीपक कुशारे, पोलीस अंमलदार रवींद्र आखडमल, अतुल पाटील, सुनील जावरे, योगेश दाभाडे, गोविंद कोळी, विनोद अखडमल, मनोज दाभाडे, मनोज महाजन, सचिन वाघ, आरीफ तडवी, सोमा ठाकरे, शांतीलाल पावरा, सुशिल पाटील, प्रशांत पवार, भटु साळुंके,अनिता पावरा, स्वाती शहा, चापोकों. विजय पाटील, होमगार्ड मिथुन पावरा, सुनील पावरा व लखन भोई आदींच्या पथकाने केली.







