जळगाव एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई : अट्टल दुचाकी चोरट्यांकडून चोरीच्या चार दुचाकी जप्त


जळगाव (22 मे 2026) : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या काही दिवसांत छडा लावत दोन अट्टल चोरट्यांना अटक केली आहे. आरोपींकडून विविध कंपन्यांच्या एकूण एक लाख 87 हजार रुपये किंमतीच्या चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. या कारवाईमुळे शहरातील दुचाकी चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार आहे.

काय आहे प्रकरण ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघनगर येथील रहिवासी संतोष रणछोड सेंदाणे (वय 47) यांची होंडा शाईन (एमएच-19 सीएल-7558) ही मोटारसायकल 17 मे 2026 रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास सिंधी कॉलनी रोडवरील समर्थ हॉस्पिटलसमोरून अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 433/2026 भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अन्वये दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तातडीने तपास पथक स्थापन करून चोरीस गेलेली दुचाकी हस्तगत करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने घटनास्थळासह शहरातील विविध भागांतील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. ‘नेत्रम’ कार्यालयातील पोलीस कर्मचारी मुबारक देशमुख यांच्या मदतीने तांत्रिक विश्लेषण करण्यात आले.

तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी महेंद्र गोपाळ चव्हाण (23, रा. खोटेनगर, जळगाव) आणि मुकेश ताराचंद चव्हाण (26, रा.पिंप्राळा हुदको, जळगाव) यांना ताब्यात घेतले. कौशल्यपूर्ण चौकशीत दोघांनीही मोटारसायकल चोरीची कबुली दिली.

चार दुचाकी जप्त
आरोपींकडून होंडा शाईन (एम.एच.19 सी.एल.7558), टीव्हीएस वेगो मोपेड (एम.एच.19 सी.ए.5949), हिरो डिलक्स (एम.एच.18 ए.के.0235), बजाज पल्सर (एम.एच.19 ई.आर.5456) दुचाकी जप्त करण्यात आल्या.

यांनी केली कारवाई
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, किरण चौधरी, गणेश ठाकरे, रमाकांत साळुंखे, शशिकांत मराठे, किरण पाटील, योगेश घुगे तसेच मुबारक देशमुख आदींनी केली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !