धुळे जिल्हा हादरला : लग्नाच्या वादातून मातृहत्येचा धक्कादायक शेवट
रिक्षा चालक मुलाने आईवरच ओतला ज्वलनशील पदार्थ ; उपचारादरम्यान वृद्धेचा मृत्यू
Dhule District Shaken : Shocking Climax to a Dispute Over Marriage—Mother Murdered धुळे (23 मे 2026) : धुळे जिल्ह्यातील महिंदळे येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे. रिक्षा चालक असलेल्या मुलाने आपले लग्न लावून न दिल्याच्या रागातून आपल्या आईलाच पेटवून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत वृद्ध आईचा मृत्यू झाला आहे. जिजाबाई भटू खैरनार-पाटील (65) असे मृत्यू झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. संशयित प्रदीप उर्फ दगडू भटू खैरनार-पाटील (45) याला धुळे तालुका पोलिसाींन ताब्यात घेतले आहे.
अशी आहे नेमकी घटना ?
जिजाबाई खैरनार या आपल्या मुलगा प्रदीपचा विवाह लावून देत नसल्याचा संशय प्रदीपच्या मनात असल्याने घरात त्यातून अनेकदा खटकेही उडाले व त्यातच शुक्रवारी मध्यरात्री सुमारे दीड वाजेच्या सुमारास प्रदीप मद्यधुंद अवस्थेत घरी आल्यानंतर त्याने विवाह न लावून देण्याची कुरापत काढली. माय-लेकांमध्ये शाब्दीक वाद झाल्यानंतर संशयीत प्रदीपने जिजाबाई खैरनार यांच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून त्यांना पेटवून दिले. या घटनेत त्या गंभीर भाजल्या गेल्या आणि अखेर त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच धुळे तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व संशयित प्रदीप उर्फ दगडू खैरनार याला चौकशीसाठी ताब्यात घेत त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.










