डांभूर्णीत एकाच रात्री तीन घरे फोडली : 94 हजाराचा मुद्देमाल लंपास
Three Houses Burglarized in a Single Night in Dambhurni: Goods Worth ₹94,000 Stolen यावल (23 मे 2026) : यावल तालुक्यातील डांभूर्णी गावात एकाच रात्रीत अज्ञात चोरट्यांनी तीन ठिकाणी घरफोडी केली. यात दोन घरातून सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम मिळून 94 हजारांचा मुद्देमाल लांबवण्यात आला तर एका घरातील रहिवाशी हे मुंबईला गेले असल्यामुळे त्यांच्या घरातून काय चोरी झाले आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही. याप्रकरणी यावल पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.आहे.
एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोडी
डांभूर्णी. ता.यावल गावात संतोष ज्ञानेश्वर कोळी हे पशू पालक शेतकरी राहतात. त्यांच्या घरात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून त्यांच्या घरातून सोन्या-चांदीचे दागिने असा 43 हजारांचा मुद्देमाल लांबवला. त्याचप्रमाणे गावातीलच युवराज चिंधु पाटील यांच्या घरात देखील अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. येथूनदेखील घराच्या दरवाज्याच्या कडीकोंडा उघडून घरात प्रवेश करून सोन्या-चांदीचे दागिने रोख रक्कम असा 51 हजारांचा मुद्देमाल लांबवण्यात आला.




दोन्ही घरातून तब्बल 94 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवण्यात आला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर यावल पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी सहायक निरीक्षक अजयकुमार वाढवे, पोलीस हवलदार संदीप सूर्यवंशी, किशोर परदेशी पथकासह दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला आहे. याप्रकरणी संतोष कोळी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास डीवायएसपी अनिल बडगुजर, पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एम.जे.शेख करीत आहे.







