रावेर-यावलमध्ये डिझेल तुटवड्याने केळी उद्योग संकटात
शेतकरी व व्यापार्यांवर आर्थिक संकट ; वंचित बहुजन आघाडीची प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी
Banana Industry in Crisis in Raver-Yawal Due to Diesel Shortage रावेर (23 मे 2026) : जळगाव जिल्ह्यातील रावेर आणि यावल तालुका हा संपूर्ण राज्यात केळी पट्टा म्हणून ओळखला जातो. या भागातील हजारो शेतकरी, मजूर, वाहतूक व्यावसायीक तसेच व्यापारी वर्ग केळी उत्पादन व व्यापारावर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे अवलंबून आहे. राज्यासह देशातील विविध बाजारपेठांमध्ये येथील केळी मोठ्या प्रमाणावर पाठविली जाते त्यामुळे येथील केळी अर्थव्यवस्था ही ग्रामीण अर्थचक्राचा महत्त्वाचा आधार मानली जाते मात्र, सध्या रावेर – यावल तालुक्यात निर्माण झालेल्या डिझेल व इंधन तुटवड्यामुळे संपूर्ण केळी उद्योग गंभीर संकटात सापडला आहे. दरम्यान, जळगाव पूर्वच्या वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शमिभा पाटील यांनी जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.



शेतकर्यांसह व्यापारी अडचणीत
सिंचनासाठी वापरल्या जाणार्या मोटारी, फवारणी यंत्रणा, ट्रॅक्टर तसेच केळी वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर डिझेलची आवश्यकता असते. परंतु इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकरी व व्यापार्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
इंधन उपलब्ध नसल्यामुळे केळी वाहतुकीस विलंब होत असून माल वेळेवर बाजारात पोहोचत नाही. परिणामी केळी खराब होण्याचा धोका वाढला आहे. वाढत्या वाहतूक खर्चामुळे व्यापारी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला असून आधीच उत्पादन खर्च, मजुरी, खत व औषधांच्या वाढत्या किमतींमुळे त्रस्त असलेल्या शेतकर्यांसाठी ही परिस्थिती अधिक गंभीर ठरत आहे.
सध्या अनेक ठिकाणी शेतकर्यांना तासन्तास पेट्रोल पंपांवर रांगा लावाव्या लागत आहेत. मर्यादित इंधन पुरवठ्यामुळे शेती व व्यापार दोन्ही विस्कळीत झाले असून प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
वंचित आघाडीच्या अशा आहेत मागण्या
- रावेर-यावल तालुक्यात डिझेलचा नियमित व पुरेसा पुरवठा तातडीने करण्यात यावा
- केळी उत्पादक शेतकरी व वाहतूकदारांना प्राधान्याने इंधन उपलब्ध करून द्यावे
- इंधन तुटवड्याच्या परिस्थितीचा तातडीने आढावा घेऊन नियंत्रण कक्ष स्थापन करावा
- केळी वाहतुकीत अडथळे निर्माण होणार नाहीत यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात
- कृत्रिम तुटवडा अथवा साठेबाजी करणार्यांवर कठोर कारवाई करावी
तर वंचित आघाडी छेडणार आंदोलन : शमिभा पाटील
दरम्यान, प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने दखल न घेतल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वंचित आघाडीच्या जळगाव पूर्व जिल्हाध्यक्षा शमिभा पाटील यांनी दिला आहे.







