जळगावातील शिक्षकाची तीन लाख 22 हजारात फसवणूक
क्रेडीट कार्डची गोपनीय माहिती मिळवत अॅमेझॉनद्वारे खरेदी केले गिप्ट कार्ड
जळगाव (गुरुवार, 23 जुलै 2026) : जळगावातील शिक्षकाची तीन लाख 22 हजार 500 रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात सायबर भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे फसवणूक प्रकरण
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गिरीश वामनराव देवकर ( 45, प्लॉट क्र. 45, अनुराग कॉलनी, महाबळ, जळगाव) हे शिक्षक असून त्यांच्या मोबाईलची माहिती अज्ञात आरोपीने बेकायदेशीररित्या मिळवली. त्यानंतर फिर्यादीच्या अॅक्सीस बँकेच्या क्रेडिट कार्डची माहिती हस्तगत करून अॅमेझॉन गिफ्ट कार्ड खरेदीच्या माध्यमातून त्यांच्या परवानगीशिवाय तीन लाख 22 हजार 500 रुपये ऑनलाईन व्यवहारातून लंपास करण्यात आले.
ही घटना 6 जून 2026 ते 9 जुलै 2026 या कालावधीत घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. फसवणुकीची बाब निदर्शनास आल्यानंतर फिर्यादीने रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.



