भुसावळ रेल्वे स्थानकावर आरपीएफची मोठी कारवाई ; दोन मोबाईल चोरटे जाळ्यात : चोरीचे नऊ मोबाईल जप्त
भुसावळ (गुरुवार, 23 जुलै 2026) : भुसावळ रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणार्या ‘ऑपरेशन पॅसेंजर सिक्युरिटी’ अंतर्गत रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) मंगळवारी दोन स्वतंत्र कारवायांमध्ये दोन सराईत मोबाईल चोरट्यांना अटक करीत त्यांच्याकडून चोरीचे तब्ल नऊ मोबाईल जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या मोबाईलची एकूण किंमत एक लाख 94 हजार रुपये इतकी आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी दोन्ही आरोपींना शासकीय रेल्वे पोलिस (जीआरपी) भुसावळ यांच्या ताब्यात देण्यात आले.
अशी झाली कारवाई
पहिल्या कारवाईत सीपीडीएस पथकावरील प्रधान आरक्षक महेंद्र कुशवाहा, प्रधान आरक्षक इमरान खान, आरक्षक योगेंद्र वानखेडे व आरक्षक भूषण पाटील हे कर्तव्यावर असताना दुपारी सुमारे एक वाजता भुसावळ स्थानकाच्या दक्षिण बाजूच्या मुसाफिरखान्यात एक संशयित व्यक्ती फिरताना आढळली. त्याची चौकशी केली असता समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्याला आरपीएफ कार्यालयात आणण्यात आले. सहायक उपनिरीक्षक दीपक कवले यांनी सखोल चौकशी केली असता त्याने आपले नाव मो. मेराज मो. शमीम अन्सारी (वय 26, रा. बुराडी, ता. मलकापूर, जि. बुलढाणा) असे सांगितले.
पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याच्याकडून 68 हजार रुपये किमतीचे दोन महागडे मोबाइल जप्त करण्यात आले. यामध्ये विवो व्ही-29 आणि सॅमसंग गॅलेक्सी एस-24 (5जी) या मोबाइलचा समावेश आहे. चौकशीत त्याने तीन-चार दिवसांपूर्वी भुसावळ स्थानकाच्या दक्षिण बुकिंग कार्यालयाजवळ झोपलेल्या प्रवाशाच्या खिशातून हे मोबाइल चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर आरोपीला जीआरपी भुसावळ यांच्या ताब्यात देण्यात आले असून संबंधित गुन्ह्यात त्याला नामनिर्देशित करण्यात आले आहे.
यावल तालुक्यातील चोरट्याला अटक
दुसर्या कारवाईत याच पथकाने प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वर संशयास्पदरीत्या फिरणार्या जावेद रहमान तडवी (वय 32, रा. परसाडे, ता. यावल, जि. जळगाव) याला ताब्यात घेतले. सहायक उपनिरीक्षक महिपाल सिंग यांनी चौकशी केली असता त्याच्याकडून सुरुवातीला 61 हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल जप्त करण्यात आले. त्याने हे मोबाइल 19 जुलै रोजी गाडी क्रमांक 22845 च्या स्लीपर डब्यातून चोरी केल्याची कबुली दिली.
पुढील चौकशीत त्याने आणखी अनेक मोबाईल चोरी करून यावल येथील एका दुकानात विकल्याची माहिती दिली. त्यानुसार जीआरपीच्या मदतीने यावल येथे छापा टाकून आणखी पाच मोबाईल जप्त करण्यात आले. अशा प्रकारे त्याच्याकडून एकूण सात मोबाईल फोन, ज्यांची किंमत एक लाख 26 हजार रुपये आहे. या प्रकरणातही जीआरपी भुसावळ यांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला असून उर्वरित मोबाइलचा मूळ मालक शोधण्याचे काम सुरू आहे.
याच दिवशी ‘ऑपरेशन डिग्निटी’ अंतर्गत रेल मदत प्रणालीवर प्राप्त झालेल्या माहितीनुसार मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असलेल्या बिट्टू उमेश चौधरी या युवकाची ओळख व पडताळणी करून त्याला सुरक्षितपणे त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आरपीएफकडून सातत्याने विशेष मोहीम राबविण्यात येत असून संशयास्पद हालचाली करणार्या व्यक्तींवर बारकाईने लक्ष ठेवून अशा कारवाया सुरू राहणार असल्याचे रेल्वे सुरक्षा दलाकडून सांगण्यात आले.



