शिरपूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई : तीन गावठी पिस्तुलासह येवला तालुक्यातील दोघे जाळ्यात
मध्यप्रदेशातून शिरपूरकडे शस्त्रांची तस्करी होताना कारवाई ; 1.06 लाखांचा मुद्देमाल जप्त
Major Operation by Shirpur Taluka Police : Two Individuals from Yeola Taluka Apprehended with Three Country-Made Pistols शिरपूर (24 मे 2026) : शिरपूर तालुका पोलिसांनी अवैध शस्त्रांविरोधात मोठी कारवाई करत येवला तालुक्यातील दोन संशयितांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून तीन गावठी पिस्तुले, सहा जिवंत काडतुसे आणि दोन अतिरिक्त मॅगझिन असा सुमारे एक लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईने अवैधरित्या शस्त्रांची तस्करी करणार्यांच्या गोटात खळबळ उडाली आहे तर मध्यप्रदेशातील उमर्टी भागातील शस्त्र तस्करी पुन्हा ऐरणीवर आली आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
शनिवार, 23 मे 2026 रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शिरपूर तालुका पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की, दोन इसम मध्यप्रदेशातील उमर्टी परिसरातून गावठी कट्टे व जिवंत काडतुसे घेऊन आंबेमार्गे शिरपूरकडे येत आहेत. या माहितीच्या आधारे प्रभारी पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने सापळा रचण्यात आला.
आरोपी पसार होण्यापूर्वीच जाळ्यात
पोलीस पथक आंबे गावाच्या परिसरात पोहोचले असता दगडी बाकड्याजवळ दोन संशयित इसम उभे असल्याचे दिसून आले. पोलिसांची गाडी पाहताच त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी वेगाने पाठलाग करत दोघांनाही पकडले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे विकास उर्फ पल्लुराम मनोज घारु (30, बाजीराव नगर, गणपती मंदिराजवळ, नालंदा किराणा दुकानामागे, रा.येवला, जि.नाशिक) व रावसाहेब अशोक मोरे (29, रा.निमगाव, ता.येवला, जि.नाशिक) अशी आहेत.
मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त
आरोपींच्या अंगझडतीमध्ये आरोपींकडून तीन गावठी कट्टे (पिस्टल), सहा जिवंत काडतुसे, दोन अतिरिक्त मॅगझीन असा एकूण 1 लाख 6 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय ढिवरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला व आरोपींना अटक करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे करीत आहेत.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, पोलीस उपअधीक्षक विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, उपनिरीक्षक मनोज कचरे, हवालदार संतोष पाटील, संदीप ठाकरे, राजू ढिसले, कॉन्स्टेबल योगेश मोरे, विजय ढिवरे, स्वप्निल बांगर, चालक अल्ताफ मिर्झा, चालक इसरार फारुकी आदींच्या पथकाने केली.







