सुवर्ण कारागिराला विद्युत धक्का देवून दागिणे लांबवण्याचा प्रयत्न : भुसावळातील आरोपीला बेड्या
तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्हीच्या आधारे शनिपेठ पोलिसांची कारवाई
Attempt to Steal Jewelry by Electrically Shocking Goldsmith : Accused from Bhusawal Arrested जळगाव (25 मे 2026) : जळगावच्या बालाजीपेठ परिसरात चांदीचे दागिने बनविणार्या कारागिराला विद्युत धक्का देऊन दागिने लांबविण्याचा प्रयत्न करणार्या भुसावळातील आरोपीला शनिपेठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. अभिषेक राजेंद्र शर्मा (31, रा.साकरी फाटा, शिवकॉलनी, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
असे आहे प्रकरण
मिळालेल्या माहितीनुसार, बालाजीपेठेतील आर. एल. ज्वेलर्सच्या मागील बाजूस असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावर भरत वसंतराव भामरे हे चांदीचे दागिने बनविण्याचे काम करतात. शनिवार, 16 मे रोजी दुपारच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधून आलेल्या एका संशयिताने काळ्या रंगाच्या शॉक मशिनच्या सहाय्याने भामरे यांना विद्युत धक्का दिला. त्यानंतर त्यांना बेशुद्ध करून जवळील चांदीचे दागिने चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.


या प्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक खेडकर हे या गुन्ह्याचा तपास करीत होते. तपासादरम्यान संशयिताचा माग काढण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळ तसेच भुसावळकडे जाणार्या मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली.
तांत्रिक विश्लेषणातून संशयित हा भुसावळमधील कंडारी शिवार परिसरातील असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी अभिषेक राजेंद्र शर्मा (31, रा. साकरी फाटा, शिवकॉलनी, भुसावळ) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी (एम.एच.19 बी.के.8775) जप्त करण्यात आली. गुन्ह्यावेळी परिधान केलेले कपडे आणि मोबाईल फोनही हस्तगत करण्यात आला आहे.
यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई सहाय्यक निरीक्षक साजीद मन्सुरी, उपनिरीक्षक खेडकर, गुन्हे शोध पथकातील योगेश जाधव, निलेश घुगे, अमोल वंजारी, पराग दुसाणे, योगेश साबळे, काजन सोनवणे, नेत्रमचे मुबारक देशमुख यांनी केली.






