धुळ्यातील मोहाडीनगर पोलिसांची मोठी कामगिरी : एमपीतील चड्डी-बनियन गँगच्या प्रमुखास ठोकल्या बेड्या
इतर चोर्या उघडकीस येण्याची आशा : गँगमधील पसार सदस्यांचा कसून शोध सुरू
Major Breakthrough by Dhule’s Mohadinagar Police: Leader of MP’s ‘Chaddi-Banian Gang’ Arrested धुळे (28 मे 2026) : धुळे शहरातील अवधान परिसरात झालेल्या घरफोडी प्रकरणाचा छडा लावत मोहाडीनगर पोलिसांनी चड्डी-बनियन गँगच्या प्रमुखाला मध्यप्रदेशातून अटक केली आहे. कुंदनसिंग उर्फ कुंद्या भिकीया डावर (35, रा.परेठा, ता.कुक्षी, जि.धार, मध्यप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे..
काय घडले धुळ्यात ?
3 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे सुमारे तीन वाजेच्या सुमारास एमआयडीसी अवधान परिसरातील अनुराग मोराणकर व विवेक मोराणकर यांच्या मालकीच्या एलमेक इंजिनिअर्स कंपनीच्या गोडाऊनमध्ये अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून केबिनमधील ड्रॉवरमधून एक लाख 25 हजार रुपयांची रोकड चोरून नेली होती. याप्रकरणी मोहाडीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन करंडे करीत असताना मोहाडीनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील व सहकार्यांना अवधान परिसरातील चोर्या चड्डी-बनियन गँग करीत असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर विशेष तपास पथकाची स्थापना केली.
पोलीस निरीक्षक अशोक पायमोडे व पोलिस अंमलदार यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने परिसरात सातत्याने पेट्रोलिंग करून विविध सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली तसेच आरोपींचे वर्णन, राहणीमान आणि गुन्हे करण्याच्या पद्धतीचा सखोल अभ्यास करण्यात आला.तपासादरम्यान संबंधित चोरटे हे मध्यप्रदेशातील चड्डी-बनियन गँगचे सदस्य असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या विशेष पथकाने सलग आठ दिवस मध्यप्रदेशात ठाण मांडून आरोपींचा शोध घेतला. अखेर धार जिल्ह्यातील परेठा, ता.कुक्षी येथून कुंदनसिंग उर्फ कुंद्या भिकीया डावर (35) याला ताब्यात घेण्यात आले.
चौकशीदरम्यान त्याने अवधान येथील घरफोडीची कबुली दिली असून त्याच्या अटकेमुळे गुन्ह्याचा उलगडा झाला आहे. तसेच या टोळीतील इतर साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपसे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील, पोलीस उपनिरीक्षक अशोक पायमोडे, पोलीस उपनिरीक्षक नितीन करंडे, पोलीस अंमलदार निलेश पाटील, ललिता मराठे, दरबारसिंग गिरासे, मनीष सोगगिरे, मयूर थोरात, मुकेश मोरे, भगवान ढाकणे आदींच्या पथकाने केली.

