राज्यातील बहुतांश भागात 10 जूननंतर पाऊस होणार दाखल
मुंबई (31 मे 2026) : कडाक्याच्या उन्हापासून हैराण झालेल्या नागरिकांना पावसाची प्रतीक्षा लागून आहे मात्र पावसाच्या आगमनाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्यातील बहुतांश भागात किमान 10 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता नसल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे मात्र 1 जूनपासून सुरू होणार्या आठवड्यात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रासह अनेक भागांत वादळी पावसाची शक्यता असल्याने हवामानात मोठे बदल होणार आहेत.
सध्या राज्यातील हवामान बदलण्यास सुरुवात झाली असून येत्या आठवड्यात त्याचे परिणाम अधिक स्पष्टपणे जाणवतील. प्रामुख्याने खानदेश, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन काही ठिकाणी वादळी वार्यासह पावसाचा अंदाज आहे. कोकण किनारपट्टीवरही पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
या पावसाळसदृश वातावरणामुळे मे महिन्याच्या तुलनेत राज्याच्या कमाल तापमानात काही प्रमाणात घट होऊन नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळेल. असे असले तरी, पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पारा अद्यापही 40 अंश सेल्सिअसच्या वरच राहण्याची शक्यता आहे.
मान्सून अद्याप केरळातच
हवामान विभागाने स्पष्ट केले आहे की, आगामी काळात होणारा वादळी पाऊस हा मान्सूनचा पाऊस नाही. मान्सून अद्याप केरळमध्ये पोहोचलेला नसल्यामुळे महाराष्ट्रात त्याचे आगमन लांबणीवर पडले आहे. या पार्श्वभूमीवर, कृषी विभागाने शेतकर्यांना अत्यंत मोलाचा सल्ला दिला आहे. मान्सूनपूर्व पडणार्या वादळी पावसावर अवलंबून राहून शेतकर्यांनी पेरणीची अजिबात घाई करू नये. पुरेशा पावसाअभावी पेरणी केल्यास बियाणे वाया जाण्याची भीती असल्याने, मान्सूनचे अधिकृत आगमन आणि जमिनीतील ओलावा पाहूनच पेरणीचा निर्णय घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
