अन्न व औषध प्रशासनाची धुरा तुकाराम मुंढेंनी स्वीकारताच जळगाव जिल्ह्यातही कारवाईचा धडाका : खुले खाद्यतेल तसेच विनापरवाना कोल्डींक्स विकणार्यांवर कारवाई
जळगाव (3 जून 2026) : अन्न व औषध प्रशासन विभागाची धूरा नूतन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्वीकारल्यानंतर जळगाव जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासन विभाग अधिक सतर्क झाला आहे. जळगाव जिल्ह्यात दोन स्वतंत्र कारवाया करत खुल्या स्वरूपात विक्रीस ठेवलेले खाद्यतेल तसेच मानकांनुसार नसलेल्या शीतपेयांचा एकूण एक लाख 55 हजार 640 रुपयांचा साठा जप्त करण्यात आल्याने विक्रेत्यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.
अशी झाली कारवाई
जळगाव अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या माहितीच्या आधारे 28 मे रोजी पाचोरा तालुक्यातील वरखेडी-वाघोडे परिसरात तपासणी करण्यात आली. यावेळी रिफाइन्ड सोयाबीन तेल अन्न सुरक्षा मानक कायद्याच्या तरतुदींनुसार पॅकिंग न करता खुल्या स्वरूपात विक्रीस ठेवण्यात आल्याचे आढळून आले. अन्न सुरक्षा अधिकार्यांनी तेलाचा नमुना विश्लेषणासाठी घेतला असून उर्वरित 448 किलो साठा जप्त करण्यात आला. या साठ्याची किंमत 80 हजार 640 रुपये असल्याचे प्रशासनाने सांगितले. संबंधित प्रकरणात उत्पादकापर्यंत चौकशी सुरू असून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
विनापरवाना कोल्ड्रींक्सची विक्री
दरम्यान, 2 जून रोजी चाळीसगावात विनापरवाना शीतपेय विक्री करार्या विक्रेत्याची तपासणी करण्यात आली. यावेळी मॉन्स्टर एनर्जी तसेच झिरो एनर्जी मॉन्स्टर एनर्जी अल्ट्रा या कार्बोनेटेड कॅफिनयुक्त शीतपेयांचे मानकांप्रमाणे नसलेले नमुने आढळून आले. संबंधित शीतपेयांचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. 350 मिलीचे 480 कॅन (किंमत 60 हजार रुपये) आणि 350 मिलीचे 120 कॅन ज्याची किंमत (15 हजार रुपये) असा एकूण 75 हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पुढील पुरवठादार व उत्पादकांविरुद्ध कारवाईसाठी संबंधित कार्यक्षेत्रातील अधिकार्यांना सूचना देण्यात आल्या. संबंधित उत्पादनांचा साठा बाजारातून परत मागविण्यासाठी उत्पादक कंपनीला नोटीस बजावण्यात आली आहे.
ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहआयुक्त (अन्न) एस. आर. करकाळे यांच्या देखरेखीखाली करण्यात आली. जळगाव येथील सहायक आयुक्त (अन्न) दीनानाथ शिंदे तसेच अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर, शरद पवार आणि योगराज सूर्यवंशी यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
अन्न व औषध प्रशासनाने अन्न व्यावसायिकांना कोणत्याही प्रकारचे खाद्यतेल खुल्या स्वरूपात विक्री न करण्याचे आवाहन केले असून ग्राहकांनी केवळ पॅकबंद खाद्यतेलाचीच खरेदी करावी, असे सांगितले आहे. जिल्ह्यात कुठेही भेसळ किंवा अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी टोल-फ्री क्रमांक 1800222365 वर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.



