हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली : डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य


जळगाव (6 जून 2026) : वय अवघे 12 वर्षे….हातात पुस्तके असण्याऐवजी मित्रांच्या साथसंगतीमुळे मद्याची बाटलीच आली. मद्यासोबतच गांजाचे सेवन करू लागलेल्या बालकाच्या सवयीमुळे संपुर्ण कुंटुंबच हादरले. अशा परिस्थितीत डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाच्या मानसोपचार तज्ञांच्या पुढाकारामुळे 12 वर्षीय बालकाच्या आयुष्यात व्यसनमुक्तीचा आशेचा किरण दिसून आला. रूग्णालयातील औषधोपचार आणि समुपदेशनामुळे प्रकृतीत सुधारणा होऊन बालकाचे मन पुन्हा पुस्तकांकडे वळू लागले आहे.

दुर्गुणांची संगत अन् जडले व्यसन
जळगाव शहरातील दादावाडी परिसरात 12 वर्षीय बालक हा शालेय शिक्षण घेतो. शिक्षण घेत असतांना अचानक दुर्गुणांची संगत त्याला भेटली. या संगतीमुळे तो मद्य प्राशन करू लागला. मद्याची झिंग चढत नाही म्हणून त्याने गांजा देखील ओढून पाहीला. त्यानंतर सोल्युशनचाही नशा त्याला जडला. अशा विविध नशायुक्त पदार्थांच्या व्यसनाच्या गर्तेत बुडालेल्या या 12 वर्षीय बालकाचा स्वभाव चिडचिडा झाला. त्याचे दैनंदिन जेवण देखील कमी झाले त्यामुळे त्याच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होऊ लागला. मुलाच्या या सवयीमुळे संपुर्ण कुटुंबच हादरले. त्याच्या पालकांनी तातडीने डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात मुलाला उपचारासाठी दाखल केले.

याठिकाणी डॉ. हुमेद महाडिक, डॉ. उमा चांदूरकर, डॉ. हिमांशू जाधव, डॉ. देवांश गणात्रा, डॉ. ऋचिता आटे, डॉ. सोनाजी गायके, डॉ. निकिता खाटवानी, डॉ. अभिलाषा राठोड, डॉ. फरीन सुरैय्या, डॉ. रेशल श्रीवास्तव यांच्या टीमने बालकाची तपासणी केली. त्याचा सीटी स्कॅन तपासणीही करण्यात आली. त्यानंतर त्याच्यावर औषधोपचार सुरू करण्यात आले. यासोबतच त्याचे समुपदेशनही करण्यात आले. औषधोपचार आणि समुपदेशनामुळे बालकाच्या प्रकृतीत सुधारणा झाली. तसेच व्यसनांपासून मन वळविण्यासाठी त्याला इतर कलाकृती शिकविण्यात आल्या. डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील मानसोपचार तज्ञ डॉक्टरांच्या पुढाकारामुळे बालकाच्या जीवनात आशेचा किरण दिसूू लागला आहे.

औषधोपचार आणि समुपदेशनाचा उपयोग
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या बालकाला संगतीतील मित्रांमुळे व्यसनाची सवय जडली होती. आजुबाजूला जसे वातावरण असते तसाच प्रभाव आपल्या मनावर पडत असतो. या बालकाच्या बाबतीत असेच दिसून आले. त्यामुळे औषधोपचार आणि समुपदेशन अशा दोन्ही पध्दतींचा उपचारासाठी उपयोग करण्यात आला. त्यामुळे बालकावर करण्यात आलेले उपचार यशस्वी ठरले असे डॉ.उल्हास पाटील रूग्णालयाचे डॉ.देवांश गणात्रा म्हणाले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !