अमळनेर प्रांताधिकारी अॅक्शन मोडवर : दोन डंपरसह 27 ब्रास वाळू जप्त
Amalner Sub-Divisional Officer in action mode : 27 brass of sand and two dumpers seized अमळनेर (17 जून 2026) : खबरी आणि सहकारी कर्मचार्यांना थांगपत्ता न लागू देता अमळनेर उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांनी 15 जून रोजी पहाटे दोन वाजता खाजगी वाहनाने चोपडा तालुक्यात यावल रोड व गरताड शिवारात छापे टाकून दोन डंपर, 27.5 ब्रास वाळू असा एकूण 46 लाख 66 हजार 325 रुपयांची मालमत्ता जप्त करून दोघा डंपर चालकांवर चोपडा पोलिसात गुन्हा दाखल केला.
अवैध वाळू वाहतुकीला ऊत
वाळूचे ठेके बंद झाल्यानंतरदेखील अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांना मिळाली होती. शासकीय वाहनाने आणि कर्मचार्यांना सांगून गेल्यानंतर माहिती लिक होत होती आणि छापे निष्फळ ठरत होते म्हणून अखेरीस उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांनी शासकीय वाहन घरी ठेवून खाजगी वाहन घेऊन मंडळाधिकारी, गौरव शिरसाठ तसेच ग्राम महसूल अधिकारी जितेंद्र पाटील व अमोल पाटील यांना कारवाई बाबत गोपनीयता ठेवत फक्त रात्रीच्या गस्तीला जायचे असे सांगून अचानक चोपडा तालुक्यात धडक मारली.
20 लाखांचे डंपर व वाळू जप्त
यावल रोडला बडगुजर पेट्रोल पपंजवळ डंपर (क्रमांक जी.जे.07 व्ही. डब्ल्यू.7935) हा अडीच ब्रास वाळू वाहतूक करताना आढळून आला. डंपर अडवून मयूर भंगाळे यांनी पोलीस निरीक्षक पवन देसले, तसेच महसुल कर्मचारी संजय सैतवाल, जगदीश कापडे, विनोद भालेराव यांना बोलावून घेतले. पंचनामा करून वाहन चालक मनोज कैलास कोळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला व 20 लाख रुपयांचे डंपर आणि 60 हजार 575 रुपयांची वाळू जप्त करण्यात आली. तपास जगदीश पाटील करीत आहेत.
गरताड रस्त्यावरही कारवाई
लागलीच मयूर भंगाळे व त्यांच्या पथकाने गरताड रस्त्यावर पहाटे अडीच वाजता छापा टाकला असता संजय पाटील व संजय अग्रवाल यांच्या गट नंबर 227/2 या मिक्सर प्लॉटवर डंपर (क्रमांक एम.एच 32 क्यू.294) मध्ये थोडी वाळू आणि त्याठिकाणी 25 ब्रास वाळू साठा आढळून आला. पोलिसांना आणि स्थानिक महसूल कर्मचार्यांना बोलावून त्या डंपर चालकांवर चोरीचा गुन्हा दाखल करून 20 लाख रुपयांचा डंपर व सहा लाख पाच हजार 750 रुपयांची वाळू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपास हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर जवागे करीत आहेत.
विनापरवाना, अवैध गौण खनिज वाहतुकीवर कठोर कारवाई करण्यात येईल. महसूल कर्मचार्यांनी आपापल्या क्षेत्रात लक्ष ठेवावे तसेच जप्त केलेल्या वाहनांची तक्रार आरटीओ विभागाकडे देखील करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी मयूर भंगाळे म्हणाले.




