पाच हजारांची लाच भोवली : ग्रामपंचायत अधिकारी एसीबीच्या जाळ्यात


नाशिक (बुधवार, 12 ऑगस्ट 2026) : ग्रामपंचायत अधिकार्‍याला पाच हजारांची लाच घेताना अहिल्यानगर एसीबीने अटक केली आहे. महादेव मल्हारी ढाकणे (52, ग्रामपंचायत जातेगाव, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) असे कारवाई करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

असे आहे लाच प्रकरण
तक्रारदार पुरुष असून त्यांचे वय 51 वर्षे आहे. तक्रारदार यांनी ग्रामपंचायत जातेगाव येथील सन 1988 च्या जन्म-मृत्यू नोंदवहीत नोंद आहे किंवा नाही तसेच त्यासंदर्भातील इतर माहिती मिळावी, यासाठी ग्रामपंचायत अधिकार्‍याशी फोनद्वारे संपर्क साधला होता. यावेळी सदर माहिती देण्यासाठी अधिकारी ढाकणे यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच माहिती मिळण्यास विनंती केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने अहिल्यानगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.




तक्रारीची पडताळणी जामखेड येथील हॉटेल महाभागवती येथे करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत अधिकार्‍याने पंचांसमक्ष तक्रारदाराकडे संबंधित माहिती देण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले व सापळा दरम्यान पाच हजारांची लाच स्वीकारताच आरोपीला अटक करण्यात आली.

यांनी केला सापळा यशस्वी
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सविता तांबे, पोलीस नाईक चंद्रकांत काळे, पोलीस कॉन्स्टेबल शेखर वाघ आणि चालक पोलीस हवालदार करांडे आदींच्या पथकाने केली.

लाचखोरांविरोधात तक्रारीचे आवाहन
कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचार्‍याने लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाने केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !