दुकान लावण्याच्या वादातून चाळीसगावात तरुणाची हत्या : त्रिकूटाला अटक
विटांनी डोक्यासह तोंडावर केला मारा : संशयीतांना चार दिवसांची पोलीस कोठडी
Youth murdered in Chalisgaon over dispute regarding setting up a shop ; trio arrested चाळीसगाव (20 जून 2026) चाळीसगाव शहरातील गजबजलेल्या बसस्थानकामागे दुकान लावण्याच्या वादातून त्रिकूटाने विटांचा मारा केल्याने 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू ओढवला. ही धक्कादायक घटना गुरुवारी मध्यरात्रीनंतर घडली. या प्रकरणी त्रिकूटाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली. न्यायालयाने आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अक्षय भानुदास पाटील (27, लक्ष्मी नगर, चाळीसगाव) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
काय घडले चाळीसगावात ?
सूत्रांच्या माहितीनुसार, अक्षय पाटील (27, रा.लक्ष्मीनगर, चाळीसगाव) या युवकासोबत बसस्थानकामागे दुकान लावण्याच्या कारणावरून संशयीतांनी वाद घातला व शाब्दीक वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपींनी अक्षयच्या डोक्यावर व तोंडावर विटा मारल्याने तो गंभीर जखमी झाला. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर नातेवाईक संतप्त झाले व त्यांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली.



तीन आरोपींना अटक
शहर पोलिसात भानुदास राजाराम पाटील (75, लक्ष्मीनगर, चाळीसगाव) यांच्या फिर्यादीवरून संशयीत निखील उर्फ भोला सुनील अजबे (लक्ष्मी नगर, चाळीसगाव) व त्याच्या दोन साथीदारांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून लागलीच त्यांना अटक केली. तपास पोलीस निरीक्षक अमित मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप घुले करीत आहेत. दरम्यान, आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

