पोलिस भरतीची स्वप्ने समुद्राच्या लाटांनी हिरावली : संभाजीनगरचे पाच तरुण गणपती पुळेतील समुद्रात बुडाले
Sea waves snatch away dreams of police recruitment: Five youths from Sambhajinagar drown in the sea at Ganpatipule. रत्नागिरी (20 जून 2026) : सुट्यांमुळे विकेंड साजरा करण्यासाठी गणपती पुळे येथे आलेल्या संभाजीनगर जिल्ह्यातील पाच पर्यटकांचा समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला तर सुदैवाने तिघांना वाचवण्यात यश आले. ही धक्कादायक घटना शनिवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली.
यांचा ओढवला मृत्यू
मृतांमध्ये आदित्य संतोष राऊत (22), अनिकेत बंडू हिवराळे (20), आनंद राजू नरवडे (20), प्रेम दीप आदमाने (19), यश दामोदर कांबळे (20) अशी मृतांची नावे आहेत तर तिघांना वाचवण्यात यश आले आहे.



विकेंड बेतला जीवावर
वीकेंडचा आनंद घेण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ गणपतीपुळे येथे छत्रपती संभाजीनगर येथून शनिवारच्या सुट्टीनिमित्त एकूण 19 जणांचा ग्रुप आला होता. सकाळी देवदर्शन आटोपल्यानंतर सकाळी 10 वाजेच्या सुमारास यातील काही जण समुद्रकिनार्यावर गेले आणि पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पाण्यात उतरले मात्र याच वेळी समुद्रात अचानक वाढलेल्या लाटांचा आणि पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज पर्यटकांना आला नाही त्यामुळे त्यातील पाच जण वेगाने खोल पाण्याकडे ओढले गेले आणि काही क्षणांतच पाण्याच्या प्रवाहात नजरेआड झाले. आपल्यासोबतचे सहकारी बुडत असल्याचे लक्षात येताच इतर सदस्यांनी एकच आक्रोश केला.
स्थानिकांची समुद्रात धाव
पर्यटक समुद्रात बुडत असल्याचे पाहताच किनार्यावरील स्थानिक ग्रामस्थ, व्यापारी आणि तेथे तैनात असलेल्या जीवरक्षकांनी जीवाची पर्वा न करता तातडीने समुद्रात धाव घेतली. त्यांनी बुडणार्या पर्यटकांना वाचवण्याचा शर्थीचा प्रयत्न केला मात्र सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने समुद्रात पाण्याचा प्रवाह प्रचंड प्रमाणात आहे. समुद्राला उधाण आल्यासारखी परिस्थिती असल्याने आणि पाण्याचा प्रवाह मागे खेचणारा असल्याने बचाव कार्यात मोठे अडथळे निर्माण होत आहेत.
पोलिस भरतीची स्वप्ने लाटांनी हिरावली
या दुर्घटनेत बळी पडलेले युवक आर्थिकदृष्ट्याा सामान्य कुटुंबातील असून आपल्या कुटुंबाची परिस्थिती सुधारण्याचे स्वप्न पाहत होते. या घटनेमुळे कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पोलिस भरतीची तयारी करणारा घरातील एकुलता एक मुलगा शुभम उर्फ प्रेम दीपक आदमाने (20, रा.बिडकीन) हा आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील खासगी कंपनीत नोकरी करतात, तर आई गृहिणी आहे. शुभम पोलिस भरतीची तयारी करत होता. कुटुंबाच्या मोठ्या अपेक्षा त्याच्यावर होत्या. तो बुडाला असल्याने आदमाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
चालकाच्या मुलाचे स्वप्न अधुरे
अनिकेत बंडू हिवराळे (वय 20) हाही पोलिस भरतीची तयारी करत होता. त्याचे वडील खासगी वाहनावर चालक म्हणून काम करतात. मेहनतीच्या जोरावर सरकारी सेवेत जाण्याचे त्याचे स्वप्न होते. मात्र समुद्राच्या लाटांनी त्याची स्वप्ने कायमची हिरावून घेतली.
रिक्षाचालकाचा मुलगा काळाच्या पडद्याआड
आनंद राजू नरवडे (वय 19) याचे वडील रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आनंदही पोलिस भरतीसाठी मेहनत घेत होता. त्याला दोन बहिणी असून कुटुंबाचा आधार बनण्याची त्याची इच्छा होती. मात्र नियतीने त्याच्यावर अकाली घाला घातला.
वडिलांचे छत्र हरपलेल्या युवकाचा दुर्दैवी अंत
यश उर्फ हिमांशू रामेश्वर कांबळे (वय 19) याला वडिलांचे छत्र नव्हते. त्याची आई एका कंपनीत मजुरी करून संसाराचा गाडा ओढत होती. यश आपल्या काकांच्या दुकानात काम करून कुटुंबाला हातभार लावत होता. संघर्षमय जीवन जगणार्या या युवकाचा अशा प्रकारे बुडाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
आईच्या कष्टांना आधार देणारा मुलगा गेला
आदित्य संतोष राऊत (वय 22) याची आई एका कंपनीत काम करते. कुटुंबात एक भाऊ असून तोही नोकरी करतो. कुटुंबाला आर्थिक आधार देण्याच्या प्रयत्नात असलेल्या आदित्यचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला.
परिसरात शोककळा
या घटनेची माहिती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पोहोचताच नातेवाईक आणि मित्रपरिवारात एकच शोककळा पसरली. पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या युवकांचा मृत्यू झाल्याने अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. गणपतीपुळे येथे प्रशासनाकडून शोध व मदतकार्य सुरू असून या घटनेने संपूर्ण पैठण तालुक्यात हळहळ व्यक्त करत आहे.

