जळगावात अग्निशमन दलाचे धाडसी बचावकार्य : बंद पडलेल्या विहिरीत कोसळलेल्या तिघांचे वाचले प्राण

गणेशवाडीतील घटना : मुख्य अग्निशमन अधिकारी स्वतः उतरले विहिरीत


Daring rescue operation by the fire brigade in Jalgaon : Lives of three people saved after they fell into a disused well जळगाव (25 जून 2026) : शहरातील गणेशवाडी परिसरात बंद पडलेल्या विहिरीत तीन जण कोसळल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी घडली मात्र अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आणि धाडसी बचाव मोहिमेमुळे तिघांनाही सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

रामलाल हिरामण भावसार (91), सिद्धेश महेंद्र भावसार (24) व दर्शन राजेंद्र खाचणे (23, रा. प्लॉट क्रमांक 9, गणेशवाडी) अशी बचावलेल्या तिघांची नावे आहेत.



मोटार काढताना घडला अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी 4.41 वाजेच्या सुमारास एन. के. पिंजारी यांनी अग्निशमन विभागाला घटनेची माहिती दिली. गणेशवाडी येथील रामदेव बाबा मंदिर व राधाकृष्ण मंगल कार्यालयासमोरील एका घराच्या मागील बाजूस असलेल्या बंद पडलेल्या विहिरीत तीन व्यक्ती मोटार काढताना पडल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

काँक्रीटचा स्लॅब तडकला
घराच्या मागील बाजूस असलेल्या विहिरीतून इलेक्ट्रिक मोटार बाहेर काढण्याचे काम सुरू असताना विहिरीवर ठेवलेला काँक्रीटचा स्लॅब अचानक तडकल्याने तिन्ही व्यक्ती थेट विहिरीत कोसळल्या. घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

अग्निशमन दलाचे धाडसी बचावकार्य
घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाने तातडीने बचाव मोहीम सुरू केली. मुख्य अग्निशमन अधिकारी अश्वजीत घरडे यांनी स्वतः विहिरीत उतरून बचावकार्याचे नेतृत्व केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अत्यंत शिताफीने आणि धाडसाने तिन्ही व्यक्तींना जिवंत बाहेर काढले.

बचाव मोहिमेत सहभागी कर्मचारी
या बचाव मोहिमेत भारत बारीसर, वाहन चालक देविदास सुरवाडे, निवांत इंगळे तसेच फायरमन रोहिदास चौधरी, तेजस जोशी, सुमित साळवे, यश मनोरे, चेतन सपकाळे, विठ्ठल पाटील आणि ऋषिकेश वाघ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

सर्व जवानांच्या प्रयत्नातून तिघांनाही बाहेर काढले
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सर्व जवानांच्या समन्वयातून आणि धाडसी प्रयत्नांमुळे तिघांनाही जिवंत बाहेर काढण्यात यश आले. वेळेत बचावकार्य झाल्याने मोठी जीवितहानी टळल्याचे जळगाव महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी अश्वजीत घरडे म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !