भुसावळात दोन खुनांच्या केंद्रस्थानी ‘रेल्वेचे भंगार’ : खरेदीदारांना करावे सहआरोपी
वाढत्या गुन्हेगारीला ठेचण्यासाठी धडक कारवाईची अपेक्षा : रेल्वे सुरक्षा बलाच्या कार्यपद्धत्तीवर प्रश्नचिन्ह
गणेश वाघ
‘Railway Scrap’ at the Center of Two Murders in Bhusawal: Buyers Should Be Made Co-accused भुसावळ (5 जुलै 2026) : भुसावळात आठवडाभराच्या अंतराने दोन निष्पाप प्रौढांची हकनाक हत्या झाली. या हत्येमागे पूर्व वैमनस्य वा गुन्हेगारी टोळ्यातील वाद नव्हते तर मुख्य कारण होते रेल्वेचे चोरी होणारे भंगार. रेल्वेचे जंक्शन असलेल्या शहरात रेल्वेचे दूरवर विभाग विखुरले असून कोट्यवधी रुपयांचे भंगार उघड्यावर पडून आहे. नेमकी हीच संधी हेरून गर्दूल्ले, नशेखोर वा गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक भंगार चोरी करतात व प्रत्यक्षदर्शीने हटकल्यास वा वाद केल्यास त्यातून खुनासारख्या घटना प्रकर्षाने घडतात हे दोन्ही घटनातून आता समोर आले आहे. खरे तर रेल्वे सुरक्षा बलाच्या पहार्यात दिवसाढवळ्या होणार्या चोर्यांनी या यंत्रणेच्या कार्यपद्धत्तीवरही आता साशंकता निर्माण होत आहे. शहरातील वाढती गुन्हेगारी व गुन्हे थांबवण्यासाठी आता पोलिसांनी कठोर भूमिका घ्यावी अन्यथा हे सत्र सुरूच राहील यात शंकाच नाही.
कोट्यवधींचे भंगार उघड्यावर पडून
शहरातील शांती नगराजवळ रेल्वे ट्रॅक ज्वॉईनची प्रक्रिया होते तर
एमओएच, पीओएच, झेडटीआरआय, रेल्वे वसाहत, पंधरा बंगला, रेल्वे यार्ड, खंडवा कॅबीन, सी कॅबीन, नागपूर एण्ड कॅबी परिसरात कोट्यवधी रुपयांची भंगार उघड्यावर पडून आहे. रेल्वे परिसरात 24 तास सुरक्षा रक्षक नसल्याची संधी भंगार चोरट्यांच्या पथ्यावर पडत आहे.

भंगार चोरीच्या वादातून दोन खून
यापूर्वी शहरातील आरपीडी रोडवरील मिलिटरी डेपोमागील कालिका मंदिराची स्वच्छता करणार्या संतोष रघुवीर मनचल (55, झेडटीआरआय परिसर, भुसावळ) यांची मारहाण करीत हत्या करण्यात आली होती. हत्येची घटना रविवार, 28 जून रोजी मध्यरात्री घडली होती व ही घटना विस्मरणात जात नाही तोच रेल्वेच्या फिल्टर हाऊसमधील कर्मचारीप्रसाद यशवंत कुलकर्णी (58, स्टार लॉन, भारंबे नगर, भुसावळ) यांची संशयीत आरोपी आकाश भानुदास गोरखा (कवाडे नगर, भुसावळ) याने डोक्यात लोखंडी पट्टी मारून हत्या केली. ही हत्यादेखील रेल्वेचे लोखंड चोरीच्या वादातून घडल्याचा संशय आहे.
कुटूंबियांचा रेल्वे अधिकार्यांवर संताप
कुलकर्णी यांना यापूर्वीदेखील आरोपीने त्रास देत धमकी दिल्याचा आरोप कुटूबियांना केला शिवाय रेल्वेच्या पाठक नामक अधिकार्याकडे ड्युटीची वेळ बदलून देण्याची मागणी करूनही त्यांनी कुठलीही दखल घेतली नसल्याचा आरोप यावेळी कुटूबियांनी केला. वास्तविक रेल्वे सुरक्षा बलाने या भागात गस्त वाढवून चोर्या रोखण्यासाठी पायबंद घालणे आवश्यक आहे मात्र ठोस कारवाई होत नसल्याने अप्रिय घटना सातत्याने घडत आहेत.
भंगार खरेदीदारांनाही करावे सहआरोपी
रेल्वेचा विस्तीर्ण व निर्जन असलेला परिसर व त्यातच रेल्वे सुरक्षा बलाची फारशी गस्त नसल्याने गर्दूल्ले तसेच सराईत गुन्हेगार भरदिवसा व रात्रीच्या वेळी भंगार चोरी करीत आहेत. विशेष म्हणजे रेल्वेचे भंगार करणे कायद्यान्वये गुन्हा असताना निर्ढावलेले भंगार खरेदीदार हे भंगार स्वस्तात खरेदी करीत आहेत. भुसावळातील वाढत्या गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी या गुन्ह्यांमध्ये आता भंगार खरेदी करणार्यांना सहआरोपी करावे, अशी अपेक्षा आहे शिवाय त्याशिवाय रेकॉर्डवरील आरोपींना आता वठणीवर आणून गुन्हेगारांना कायद्याचा धाक वाटेल, अशी कृती पोलिस दलाने केल्यास खर्या अर्थाने ती दोन्ही खुनात मृत पावलेल्यांना दोन निष्पप जिवांना आदरांजली ठरेल, अशी भावना शहरवासी व्यक्त करीत आहेत.
