उभ्या कंटेनरवर केमिकल टँकर आदळला : अपघातानंतरच्या आगीत चालक ठार : धुळे-पारोळा महामार्गावर वाहतूक ठप्प


Chemical tanker crashes into stationary container ; driver killed in ensuing fire ; traffic stalled on Dhule-Parola highway पारोळा (4 जुलै 2026) : उभ्या असलेल्या कंटेनरवर पाठीमागून भरधाव वेगात आलेला केमिकल टँकर आदळल्यानंतर झालेल्या अपघातात केमिकल टँकरला भीषण आग लागली व चालक होरपळून ठार झाला. हा भीषण अपघात धुळे-पारोळा मार्गावरील सबगव्हाण टोलनाका परिसरात शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडला. या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक सुमारे तीन तासांपर्यंत ठप्प झाली होती.

काय आहे नेमके प्रकरण
जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या माहितीनुसार, गुजरातकडून ओडीसाकडे निघालेला केमिकल टँकर (जी.जे.18 बी.व्ही.8315) पारोळाजवळील सबगव्हाण टोलनाक्याजवळ पोहोचल्यानंतर केमिकल टँकरने समोर उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर टँकरच्या टायरने पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच पारोळा येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. खबरदारीचा उपाय म्हणून महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली त्यामुळे मार्गावर सुमारे एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या.

टँकरमध्ये टोल्युइन डायआइसोसायनेट (टीडीआय) हे अत्यंत क्रियाशील रसायन असल्याची माहिती आहे. हे रसायन प्रामुख्याने लवचिक पॉलीयुरेथेन फोम, कोटिंग्ज, डेसिव्ह्ज आणि इलास्टोमर्स तयार करण्यासाठी कच्चा माल म्हणून वापरले जाते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !