भुसावळातील सुहर्ष फाउंडेशनचा हरित उपक्रम : वृक्षारोपणासाठी वनविभागाकडे 300 रोपांची मागणी


भुसावळ (5 जुलै 2026) : पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी आणि शासनाच्या हरित अभियानात सक्रिय सहभाग नोंदविण्याच्या उद्देशाने सुहर्ष फाउंडेशन, भुसावळतर्फे यावल वनविभागाकडे वृक्षारोपणासाठी सुमारे 300 विविध जातींची रोपे उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन संबंधित वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांना नुकतेच सादर करण्यात आले.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, फाउंडेशनच्या वतीने भुसावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येणार आहे. स्थानिक हवामान व मातीला अनुकूल अशा कडुलिंब, पिंपळ, शिसम, वड, आंबा, जांभूळ आदी वृक्षांची लागवड करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे.

वृक्षारोपणानंतर झाडांची देखभाल, नियमित पाणीपुरवठा आणि संरक्षणाची संपूर्ण जबाबदारी संस्था स्वीकारणार असल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे त्यामुळे वनविभागाने आवश्यक ती रोपे उपलब्ध करून देऊन या पर्यावरणपूरक उपक्रमाला सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.

सुहर्ष फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे परिसरात हरित क्षेत्र वाढण्यास मदत होणार असून पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृतीही होणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. संस्था आगामी काळातही सामाजिक व पर्यावरण संवर्धनाशी संबंधित विविध उपक्रम राबविणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !