धुळ्यात शिवशाही बसला आग : 49 प्रवासी बचावले
धुळे (गुरुवार, 23 जुलै 2026) : धुळ्यात शिवशाही बसला आग लागल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी घडली. सुदैवाने बस चालकाने प्रसंगावधान राखल्याने 49 प्रवासी बचावले. ही घटना धुळ्यातील सातपुडा हायस्कूलपासून काही अंतरावर घडली. या घटनेत सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही मात्र बस आगीत खाक झाली. आगीबद्दल देवपूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली.
अचानक बसने घेतला पेट
नंदुरबारवरून निघालेली शिवशाही बस (एम.एच.06,बी.डब्ल्यू .0471) ही बुधवारी दुपारी धुळ्यात प्रवेश करीत असताना देवपूरातील सातपुडा हायस्कूलपासून काही अंतर पुढे गेल्यावर बसमध्ये आग लागली. चालक राहुल चव्हाण, वाहक एस.एस.शेख यांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी बस रस्त्याच्या बाजूला उभी केली. शिवाय प्रवाशांना बाहेर पडण्याची सूचना केली. यामुळे सर्व प्रवासी सुखरूपपणे बाहेर पडले. काही वेळात बसने पेट घेतला. आगीची माहिती मिळताच देवपूर पोलिस स्टेशन तसेच अग्निशामक बंब दाखल झाला. 40 मिनिटांच्या परिश्रमानंतर या आगीवर नियंत्रण मिळवता आले.



