भुसावळात विद्यार्थी एकतेची वज्रमुठ : पेपरफुटीविरोधात एल्गार
हजारो विद्यार्थ्यांची प्रांत कार्यालयावर धडक ः शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
भुसावळ (शुक्रवार, 24 जुलै 2026) : दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणाच्या विरोधात आंदोलन करणार्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी शहरातील हजारो विद्यार्थ्यांच्या सहभागाने तसेच सामाजिक, शैक्षणिक व राजकीय संघटनांच्या पदाधिकार्यांच्या उपस्थितीत भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. प्रांत कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर मागण्यांचे निवेदन
उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांना देण्यात आले.
हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सुरू झालेल्या या मोर्चात सुमारे आठ हजारावर विद्यार्थी, पालक तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले. नीट पेपरफुटी मुर्दाबाद, दोषींना अटक करा, विद्यार्थ्यांना न्याय द्या, अशा घोषणांनी शहर दणाणले. लोखंडी पूल, महात्मा गांधी पुतळा, जळगाव रोडमार्गे पुढे सरकत मोर्चा प्रांत कार्यालयावर पोहोचला.
यांनी केले प्रतिनिधीत्व
या आंदोलनात विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून विवेक सपकाळे, विशाखा तायडे, फैजान शेख, जोबिया खान, जवाद खान, फरान शेख, निहा नाज, आश्विन नरवाडे, मुकुंद वाघोदे, संमेक तायडे, सागर निरभवने आणि ऋतिक इंगळे यांनी संयुक्त निवेदन सादर केले. विद्यार्थ्यांनी पेपरफुटी प्रकरणी तीव्र संताप व्यक्त करत पारदर्शक आणि निष्पक्ष परीक्षा पद्धतीची मागणी केली.
काय आहेत आंदोलकांच्या मागण्या
आंदोलकांनी सादर केलेल्या निवेदनात नीट, टीईटी व व इतर स्पर्धा परीक्षा पारदर्शक पद्धतीने घेण्यात याव्यात, पेपरफुटी व गैरव्यवहार करणार्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, स्वतंत्र चौकशी समिती नेमून दोषींना तात्काळ अटक करावी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी तसेच केंद्र व राज्य शासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन जबाबदार मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशा ठोस मागण्या करण्यात आल्या.
विविध संघटनांचा पाठिंबा
या आंदोलनाला विविध संघटनांचा मोठा पाठिंबा लाभला. रिपब्लिकन सेना विनोद सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनात सहभागी झाली. बार असोसिएशन भुसावळचे अॅड.धनराज पी. मरार यांच्या नेतृत्वाखाली वकील संघाने विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला. भुसावळ तालुका बौद्ध महासंघानेही आंदोलनास समर्थन दर्शवून शासनाकडे मागण्या पाठवल्या. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे जिल्हाध्यक्ष राजु सूर्यवंशी यांनी पत्राद्वारे पाठिंबा जाहीर केला तसेच अखिल महाराष्ट्र मुस्लिम खाटिक समाज प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन फाउंडेशनने स्टुडंट युथ आंदोलन समितीच्या माध्यमातून आंदोलनाला साथ दिली.
शांततेच्या मार्गाने आंदोलन
आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणार्या भ्रष्ट व्यवस्थेविरोधात आमचा लढा सुरू राहील. शासनाने तातडीने ठोस निर्णय घेत विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाल्याचे चित्र आहे. भुसावळमध्ये विद्यार्थी, पालक आणि विविध संघटना एकवटल्याने या आंदोलनाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले होते.



