भुसावळातील रेल्वे ताप्ती पंप हाऊस परिसरात व्यापक स्वच्छता अभियान
भुसावळ (शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2026) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर कालावधीत स्वच्छता ही सेवा 2026 अभियान उत्साहात राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने 1 ऑक्टोबर रोजी एक दिवस, एक तास, एकत्र या उपक्रमांतर्गत भुसावळातील ताप्ती नदीलगतच्या रेल्वे ताप्ती पंप हाऊस परिसरात विशेष व व्यापक स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले
कचर्याची विल्हेवाट
गणेश विसर्जनानंतर ताप्ती नदी परिसरात जमा झालेला कचरा, घनकचरा व मलबा हटवून परिसर स्वच्छ करण्याच्या उद्देशाने आयोजित या अभियानात रेल्वे अधिकारी व कर्मचार्यांसह विविध संस्थांच्या स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेतला. या स्वच्छता अभियानाचे नेतृत्व भुसावळचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांनी केले. यावेळी अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) प्रवीण कुमार पाठक, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (तांत्रिक) एम.के.मीणा, वरिष्ठ अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, बेसिक ट्रेनिंग सेंटर (सीअॅण्डडब्ल्यू) चे प्रशिक्षणार्थी, रेल्वे सुरक्षा दलाचे जवान आणि भारत स्काउट्स अॅण्ड गाईडसचे स्वयंसेवक उपस्थित होते.
श्रमदानातून स्वच्छता
सामूहिक श्रमदानातून ताप्ती पंप हाऊस तसेच ताप्ती नदीलगतच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली. यावेळी दोन ट्रॅक्टर-ट्रॉली व दोन छोट्या ट्रॉलींच्या माध्यमातून सुमारे चार टन कचरा व मलबा संकलित करून हटविण्यात आला. गणेश विसर्जनानंतर जमा झालेला कचरा व मलबा हटवून परिसर स्वच्छ व सुव्यवस्थित करण्यात आला. यासोबतच नदी संवर्धन, जलस्रोतांची स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्यात आली. या अभियानांमध्ये रेल्वे अधिकारी, कर्मचारी, प्रशिक्षणार्थी, रेल्वे सुरक्षा दलाचे जवान तसेच स्वयंसेवक सक्रिय सहभागी झाले.


