कारगिल विजय दिनानिमित्त मुदखेडचे माजी सैनिक लक्ष्मण देवदे यांना प्रतिष्ठेचा ‘सैनिक रत्न पुरस्कार’ प्रदान
नांदेड (रविवार, 26 जुलै 2026) : कारगिल विजय दिनानिमित्त मुंबई येथे आयोजित विशेष कार्यक्रमात मुदखेड येथील माजी सैनिक लक्ष्मण देवदे यांना प्रतिष्ठेचा ’सैनिक रत्न पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.
देशसेवा तसेच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत सैनिक फेडरेशनच्या वतीने हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
लक्ष्मण देवदे यांनी भारतीय सैन्यात कार्यरत असताना आसाम, नागालँड, पंजाब, मिझोराम तसेच जम्मू-काश्मीरसारख्या दुर्गम व संवेदनशील भागात सेवा बजावली. पंजाबमधील ऑपरेशन ब्ल्यू स्टार काळात त्यांनी कर्तव्य पार पाडले. तसेच श्रीलंकेत भारतीय शांतिसेनेत दोन वर्षे अत्यंत कठीण परिस्थितीत देशसेवा बजावत त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले. त्यानंतर 1997 मध्ये ते सैन्य सेवेतून सेवानिवृत्त झाले.
सेवानिवृत्तीनंतर त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय योगदान दिले. मुदखेड नगरपरिषदेचे उपाध्यक्ष, गटनेते, बांधकाम सभापती, पाणीपुरवठा सभापती तसेच आरोग्य व शिक्षण सभापती अशी विविध महत्त्वाची पदे त्यांनी भूषविली. सध्या ते मुदखेड येथील खंडोबा मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तसेच सैनिक फेडरेशन संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
आई-वडील व मोठ्या बंधूंकडून समाजसेवेचे संस्कार लाभले. सैन्य सेवा, सामाजिक कार्य आणि राजकीय क्षेत्रातील योगदानाची दखल घेत मिळालेला ‘सैनिक रत्न पुरस्कार’ हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे, अशी भावना लक्ष्मण देवदे यांनी व्यक्त केली.



