संस्कार, कविता अन् माय-बापाची माया ; ‘द्वारकाई व्याख्यानमाले’त रंगणार वैचारिक पर्व

सांस्कृतिक उपक्रम : प्रथम पुष्प 31 जुलै रोजी धुळ्याचे प्रा.डॉ.सदाशिव सूर्यवंशी गुंफणार


भुसावळ (सोमवार, 27 जुलै 2026)  जय गणेश फाउंडेशनतर्फे द्वारकाबाई कालिदास नेमाडेंच्या स्मरणार्थ तीन दिवसीय फिरती व्याख्यानमाला शुक्रवार, 31 जुलै आणि शनिवार, 1 व सोमवार 3 ऑगस्ट असे तीन दिवस रंगणार आहे. त्यात यंदा कविता, संस्कार आणि मायबापावर विचारांचे तीन पुष्प गुंफले जातील.

प्रथम पुष्प भुसावळातील झांबरे विद्यालयात
विद्यार्थ्यांना वाचन, चिंतन आणि श्रवणाची गोडी लागावी म्हणून हा उपक्रम राबवला जातो. यंदा उपक्रमाचे 13वे वर्ष आहे. गेल्या बारा वर्षात राज्यभरातील 36 वक्ते या व्याख्यानमालेत येऊन गेले. या वर्षाचे प्रथम पुष्प 31 जुलै रोजी सकाळी 9 वाजता भुसावळच्या दादासाहेब आर. जी. झांबरे माध्यमिक विद्यालयात सकाळी 9 वाजता धुळे येथील प्रा. डॉ. सदाशिव सूर्यवंशी हे गुंफतील. ‘लोकसाहित्यातून संस्कार आणि लोगजागर’ हा त्यांचा विषय आहे.

द्वितीय पुष्प कुर्‍हे विद्यालयात
द्वितीय पुष्प 1 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता कुर्‍हे पानाचे येथील रा. धो. माध्यमिक विद्यालयात खालापूरचे विशाल उशिरे आणि बुलडाण्याचे विशाल खोंदले हे गुंफतील. ‘माणसं जोडणार्‍या कविता’ हा त्यांचा विषय आहे.

तृतीय पुष्प अहिल्यादेवी विद्यालयात
तृतीय पुष्प 3 ऑगस्ट रोजी दुपारी 12.30 वाजता भुसावळच्या अहिल्यादेवी कन्या विद्यालयात बीड जिल्ह्यातील गेवराईचे प्रा. समाधान इंगळे हे गुंफतील. ‘माय-बापाला समजून घेऊ या’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. यंदाची मध्यवर्ती संकल्पना ही कविता, संस्कार आणि मायबाप अशी असल्याचे जय गणेश फाउंडेशनचे संस्थापक उमेश नेमाडे यांनी सांगितले. या वेळी अध्यक्ष राजेंद्र यावलकर, समन्वयक गणेश फेगडे व फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

असे आहेत व्याख्यानमालेचे वक्ते

प्रथम पुष्प : प्रा.डॉ.सदाशिव सूर्यवंशी हे एस.एस.व्ही.पी.एस. महाविद्यालय धुळे येथे कार्यरत आहेत. तीन काव्यसंग्रह, एक लेख संग्रह प्रकाशित आहे. महाराष्ट्र शाहीर चित्रपटासाठी भाषा मार्गदर्शक म्हणून खान्देशी संवाद लेखन. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दमदार काव्य सादरीकरण केले आहे.

द्वितीय पुष्प : विशाल उशिरे हे समाजभान जपणारे कवी आहेत. राज्यभर कवीसंमेलने गाजवली असून भूमिका घेऊन लेखन करण्याचा छंद जोपासला. ‘बाप’ कविता काळजाला भिडते. भगवान खोंदले हे पेशाने डिझाइन इंजिनिअर आहेत. विनोदी आणि शेतीमातीच्या कविता सादरीकरण गाजलेले आहे. सोशल मीडियातून सामाजिक विषयांवर भाष्य करतात.

तृतीय पुष्प : प्रा.समाधान इंगळे हे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, र.भ.अट्टल महाविद्यालय, गेवराई (जि. बीड) येथे सहाय्यक प्राध्यापक आहेत. कवी, वक्ता, शाहीर, समाजप्रबोधनपर कवितेचे व शाहिरीचे त्यांचे महाराष्ट्रभर कार्यक्रम गाजले. छत्रपती संभाजीनगरला नैमित्तीक उद्घोषक म्हणून अनेक वर्षे काम केले. प्रगतशील लेखक संघ, महाराष्ट्रचे उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !