भुसावळातील पु.ओं.नाहाटा महाविद्यालयात मूकनाट्य व प्रहसन कार्यशाळा
भुसावळ (बुधवार, 30 सप्टेंबर 2026) : विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्याबरोबरच त्यांच्या सर्जनशीलता, अभिनयकौशल्य आणि अभिव्यक्ती क्षमतेला चालना मिळावी, या उद्देशाने भुसावळ कला, विज्ञान व पी. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातर्फे ‘मूकनाट्य व प्रहसन’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन बुधवार, 30 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत अर्थशास्त्र विभागात करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एच.बर्हाटे होते. अनिल कोष्टी हे उद्घाटक होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ.डी.एन. पाटील, उपप्राचार्य डॉ.जी.आर.वाणी उपस्थित होते. कार्यक्रमाचे समन्वयक डॉ.प्रफुल्ल इंगोले हे होते.
मान्यवरांनी केले मार्गदर्शन
प्रथम सत्रात अनिल कोष्टी यांनी ‘प्रहसन : संकल्पना, सादरीकरण व मार्गदर्शन’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी प्रहसनाची संकल्पना, कथानकाची निवड, अभिनय, विनोदाची परिणामकारक मांडणी आणि सामाजिक संदेश प्रभावीपणे सादर करण्याच्या विविध पद्धती विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या.
द्वितीय सत्रात गोदावरी इंग्लिश स्कूल, भुसावळचे कुंदन तावडे यांनी ‘मूकनाट्य : संकल्पना, तंत्रे व प्रात्यक्षिक’ या विषयावर मार्गदर्शन केले. संवादाचा वापर न करता हावभाव, देहबोली, चेहर्यावरील भाव आणि हालचालींच्या माध्यमातून विचार व भावना प्रभावीपणे कशा व्यक्त करता येतात, याचे प्रात्यक्षिक त्यांनी विद्यार्थ्यांसमोर सादर केले.
यानंतर प्रात्यक्षिक, संवाद व प्रश्नोत्तर सत्र घेण्यात आले. या सत्रात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध प्रश्न विचारले. मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करून मूकनाट्य व प्रहसनाच्या सादरीकरणाबाबत उपयुक्त मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी डॉ.स्मिता चौधरी होत्या. विद्यार्थ्यांच्या कलात्मक आणि सर्जनशील विकासासाठी अशा कार्यशाळा उपयुक्त ठरतात, असे मत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा.डॉ.प्रफुल्ल इंगोले यांनी तर सूत्रसंचालन प्रा.डॉ.वंदना नेमाडे यांनी केले. आभार प्रा.डॉ. सचिन राजपूत यांनी मानले. कार्यशाळेस बहुसंख्य विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.
