मुसळधार पावसामुळे खिर्डी गावातील रस्त्यांना आले नदीचे स्वरूप

मुख्य मार्ग जलमय : ट्रॅक्टरसह मालवाहू वाहन अडकले


खिर्डी, ता.रावेर (शुक्रवार, 31 जुलै 2026) : रावेर तालुक्यासह परिसरात संततधार व मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. खिर्डी गावात पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून गावाला जोडणार्‍या मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांवर पाण्याचे साम्राज्य पसरले आहे. मुख्य रस्त्याला अक्षरशः नदीचे स्वरूप प्राप्त झाल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

रस्त्यांवर साचले चार फूट पाणी
सततच्या पावसामुळे खिर्डी गावाकडे जाणार्‍या मुख्य मार्गावर सुमारे तीन ते चार फूट पाणी साचले. पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने रस्त्यावरून जात असलेला एक ट्रॅक्टर आणि एक छोटा हत्ती (मालवाहू वाहन) रस्त्याच्या मधोमध अडकले. पाण्याची पातळी वाढल्याने दोन्ही वाहने अर्ध्याहून अधिक पाण्यात बुडाली आणि काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.

याबाबतची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने दोन्ही वाहनांच्या चालकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठा अनर्थ टळल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

दरम्यान, खिर्डी गावातील अनेक अंतर्गत रस्त्यांवरही पाणी साचल्याने नागरिकांची ये-जा विस्कळीत झाली आहे. शेतकर्‍यांनाही शेतात जाणे कठीण झाले असून अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेल्याची प्राथमिक माहिती आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे नदी-नाले आणि ओढ्यांच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांनी आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, तसेच पूरग्रस्त रस्त्यांवरून प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

स्थानिक प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून पावसाचा जोर कायम राहिल्यास खबरदारीचा उपाय म्हणून आवश्यक ती पावले उचलली जाणार असल्याचे सांगण्यात आले. गावातील ग्रामस्थांनी सुरक्षिततेला प्राधान्य देत प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !