भुसावळातील पु.ओं.नाहाटा महाविद्यालयात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त लेखन प्रेरणा दिन व ग्रंथ दिंडीचे आयोजन
भुसावळ (सोमवार, 3 ऑगस्ट 2026) : भुसावळ कला, विज्ञान आणि पी.ओ.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त लेखन प्रेरणा दिन व ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविणे, लेखनाची प्रेरणा निर्माण करणे तसेच साहित्य, ज्ञान आणि संस्कार यांविषयी जागरूकता निर्माण करणे हा होता.

कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. बी. एच. बर्हाटे यांच्या हस्ते ग्रंथ दिंडीचे उद्घाटन करून करण्यात आली. यावेळी उपप्राचार्य प्रा. डॉ. जी. आर. वाणी, उपप्राचार्य डॉ. डी. एन. पाटील, विविध विभागांचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
ग्रंथ दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी विविध ग्रंथ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यकृती आणि प्रेरणादायी पुस्तके हातात घेऊन महाविद्यालय परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात दिंडी काढली. ज्ञानाचा प्रसार, वाचन संस्कृतीचा प्रचार आणि साहित्याबद्दल आदर व्यक्त करणारे घोषवाक्य विद्यार्थ्यांनी दिले. संपूर्ण परिसरात उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.
याप्रसंगी प्राचार्य प्रा. डॉ. बी. एच. बर्हाटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, ग्रंथ दिंडी म्हणजे केवळ पुस्तकांची मिरवणूक नसून ती ज्ञान, संस्कार, विचार आणि उज्ज्वल भविष्याची वाटचाल आहे. त्यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, महात्मा ज्योतिराव फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद आणि भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांसारख्या महान व्यक्तिमत्त्वांनी वाचनाच्या माध्यमातून स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवून समाजाला नवी दिशा दिल्याचे सांगितले.
आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे वाचनाची सवय कमी होत असल्याची खंत व्यक्त करत त्यांनी विद्यार्थ्यांना दररोज किमान 30 मिनिटे नियमित वाचन करण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, पुस्तके केवळ माहिती देत नाहीत, तर योग्य निर्णयक्षमता, सकारात्मक विचार, आत्मविश्वास, सुसंस्कार आणि जीवनातील अडचणींना सामोरे जाण्याची ताकद देतात.
यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालय प्रशासन, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, ग्रंथालय विभाग, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.