नंदुरबार एसीबीची मोठी कारवाई : तळोदा तहसीलचा सहाय्यक महसूल अधिकारी जाळ्यात
चहाच्या दुकानावर स्वीकारली पाच हजारांची लाच : खान्देशात लाचखोरांविरोधात सलग दुसर्या दिवशी कारवाई
गणेश वाघ
भुसावळ (मंगळवार, 4 ऑगस्ट 2026) : एम.प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी तडजोडीअंती पाच हजारांची लाच स्वीकारताना तळोदा तहसील कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकार्याला नंदुरबार एसीबीने अटक केली आहे. या कारवाईने महसूल विभागातील लाचखोर हादरले आहेत. रवींद्र निंबा कानडे (51, तळोदा) असे अटकेतील लाचखोर आरोपीचे नाव आहे.

असे आहे लाच प्रकरण
तक्रारदारा यांनी गतवर्षी एक एकर जमीन घेतली असून त्याबाबतची नोटरी त्यांच्या पत्नीच्या नावावर केली आहे. या जमिनीचे एम.नमुना प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठीचे प्रकरण सहाय्यक महसूल अधिकारी रवींद्र कानडे यांच्याकडे होते. तक्रारदाराने संबंधित काम करून देण्यासाठी सहाय्यक महसूल अधिकारी कानडे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी कामाच्या मोबदल्यात पाच हजार रुपये लाच मागितली. तक्रारदाराने याबाबत नंदुरबार येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोमवार, 3 ऑगस्ट 2026 रोजी तक्रार दाखल केल्यानंतर पडताळणी करण्यात आली.
चहाच्या दुकानावर घेतली लाच
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सापळा रचण्यात आला. मंगळवार, 4 ऑगस्ट 2026 रोजी तळोदा तहसील कार्यालयाजवळील चहाच्या दुकानात सापळा रचण्यात आला. यावेळी आरोपी रवींद्र कानडे यांनी तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यास अटक केली. तळोदा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा नंदुरबार एसीबीचे डॅशिंग पोलीस उपअधीक्षक प्रशांत भरते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहा.उपनिरीक्षक विलास पाटील, हवालदार देवराम गावीत, हवालदार विजय ठाकरे, हवालदार जितेंद्र महाले, नाईक हेमंतकुमार महाले, नाईक सुभाष पावरा आदींच्या पथकाने यशस्वी केला.