महिलांच्या सन्मानासाठी मुक्ताईनगर एकवटले : विकृत वक्तव्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा

तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन आरोपीवर तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाईची मागणी


मुक्ताईनगर (गुरुवार, 6 ऑगस्ट 2026) : ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे, केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे, माजी खासदार डॉ.हिना गावित आणि अ‍ॅड.रोहिणी खडसे यांच्याविषयी कथितरित्या करण्यात आलेल्या अश्लील व आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ गुरुवारी मुक्ताईनगरमध्ये सर्वपक्षीय व सर्वसमाज बांधवांच्या वतीने भव्य जनआक्रोश निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात महिला, युवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

‘महिलांचा सन्मान, आमचा स्वाभिमान’, ’विकृत प्रवृत्तीचा निषेध असो’ अशा घोषणांनी संपूर्ण मुक्ताईनगर दुमदुमून गेले. प्रवर्तन चौक ते तहसील कार्यालय असा काढण्यात आलेल्या या मोर्चात पक्ष, धर्म आणि जातीच्या पलीकडे जाऊन नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन
मोर्चा तहसील कार्यालयात पोहोचल्यानंतर सर्वपक्षीय शिष्टमंडळाने तहसीलदार तसेच मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन संयुक्त निवेदन सादर केले. निवेदनाची अधिकृत पोचही स्वीकारण्यात आली.

निवेदनातील प्रमुख मागण्या अशा
कथित आरोपी विजय चौधरी याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता व माहिती तंत्रज्ञान कायद्यातील संबंधित कलमान्वये तात्काळ बिगरजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात यावा शिवाय आरोपीला विनाविलंब अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व सार्वजनिक जीवनात कार्यरत महिलांच्या सन्मान व सुरक्षिततेच्या दृष्टीने अशा विकृत प्रवृत्तींवर प्रशासनाने उदाहरणार्थ कठोर कारवाई करावी.

तर तीव्र आंदोलनाचा इशारा
निवेदनात प्रशासनाला स्पष्ट इशारा देण्यात आला असून, तातडीने कठोर कारवाई न झाल्यास मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, महिला व नागरिकांच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन व रस्ता रोको करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

सर्वपक्षीय एकजूट
या निषेध मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), भारतीय जनता पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते.त्यामुळे महिलांच्या सन्मानाच्या प्रश्नावर सर्वपक्षीय ऐक्याचे दर्शन घडले.

या मान्यवरांची उपस्थिती
मोर्चात भैयासाहेब रवींद्र पाटील, प्रमोद पाटील (जिल्हाध्यक्ष), एस.ए.भोई, डॉ.जगदीश पाटील, निवृत्ती पाटील, अनिल पाटील, दशरथ कांडेलकर, ईश्वर रहाणे, प्रवीण कांडेलकर, राजू माळी, योगेश कोलते, विलास धायडे, डॉ.बी.सी.महाजन, शिवा पाटील, ललित महाजन, अ‍ॅड.राहुल पाटील, मनोज तळेले, लक्ष्मण सापधारे, दीपक पाटील, पंकज कोळी, डी.के.पाटील, लता सावकारे, तृप्ती तुषार राणे, सुनीता भालेराव, मनीषा जावरे, अरुणा पवार यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, महिला भगिनी आणि तालुक्यातील असंख्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !