गडचिरोलीत सर्पदशांने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू : आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकासह अधीक्षकाला अटक

माजी खासदार मारोतराव कोवासे यांच्यासह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा


गडचिरोली (गुरुवार, 13 ऑगस्ट 2026) : सर्पदंशाचे तीन अल्पवयीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्यानंतर सरकार ताळ्यावर आले असून या प्रकरणी माजी खासदार मारोतराव कोवासे यांच्यासह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला तर आश्रमशाळेतील मुख्याध्यापकासह अधीक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे.

काय आहे प्रकरण ?
10 ऑगस्टच्या मध्यरात्री 2 ते 2.30 वाजेच्या सुमारास जपतलाई निवासी आश्रमशाळेत विद्यार्थिनी जेवण करून जमिनीवर झोपलेल्या असताना सहा विद्यार्थिनींना विषारी सर्पाने दंश केला. या दुर्घटनेत दीपिका लकडा (इयत्ता 6 वी), सुष्मिता मंडल (इयत्ता 8 वी), अनु कोरेटी (इयत्ता 2 री) यांचा मृत्यू झाला तर दीपिका मडावी (इयत्ता 5 वी), कविता किरंगा (इयत्ता 6 वी) आणि समृद्धी नैताम (इयत्ता 8 वी) या तीन विद्यार्थिनी जखमी झाल्या असून त्यांच्यावर गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी समृद्धी नैताम हिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. याप्रकरणी अखेर शाळेचे मुख्याध्यापक आणि अधीक्षक यांना अटक करण्यात आली असून, संस्थेचे अध्यक्ष व माजी खासदार मारोतराव कोवासे यांच्यासह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला.






मुख्याध्यापक आणि अधीक्षकाला अटक
12 ऑगस्टला मध्यरात्री धानोरा पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी आश्रमशाळेतील कर्मचार्‍यांचे जबाब उशिरापर्यंत नोंदवून घेतले. या चौकशीअंती प्रशासनाच्या हलगर्जीपणाबद्दल मुख्याध्यापक प्रशांत ताटपल्लीवार आणि अधीक्षक भास्कर भोयर या दोघांना पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे.

पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे केलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे
संस्था अध्यक्ष तथा माजी खासदार मारोतराव कोवासे, संस्था सचिव तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे विद्यमान अध्यक्ष विश्वजीत कोवासे, मुख्याध्यापक प्रशांत ताटपल्लीवार, अधीक्षक भास्कर भोयर, महिला अधीक्षिका भाग्यश्री चिल्लमवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

आदिवासी विकास मंत्र्यांची पाहणी आणि कडक कारवाईचे संकेत
राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी जपतलाई येथील आश्रमशाळेला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. पाहणीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी 5 जणांवर गुन्हे दाखल झाल्याची माहिती दिली. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून दोषी आढळणार्‍या संबंधितांवर व अधिकार्‍यांवर निलंबनाची कठोर कारवाई केली जाईल, असेही मंत्र्यांनी स्पष्ट केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !