कुंभमेळ्यात कामांसाठी ठेकेदारांना 591 कोटी रुपयांच्या बनावट वर्क ऑर्डर : जामनेरसह धुळ्यातील तिघांना अटक


Nashik Kumbh Mela Scam नाशिक (गुरुवार, 13 ऑगस्ट 2026) : आगामी कुंभमेळ्यात कामांसाठी ठेकेदारांना 591 कोटी रुपयांच्या बनावट वर्क ऑर्डर देत 3 कोटी 50 हजार रुपये उकळणारा मंत्री गिरीश महाजन यांचाच दूरचा पुतण्या असल्याचे उघड झाले असून मंगळवारी या प्रकरणात महाजनांचा मतदारसंघ असलेल्या जामनेर येथून तनय अनंत महाजन, नरेंद्र तोताराम महाजन, शकील अहमद सलीमउद्दीन शेख (मूळ रा. धुळे) यांना अटक करण्यात आली.

नातेवाईक असलातरी गय नाही
बुधवारी मंत्री महाजनांनीच जामनेर येथे माध्यमांना सांगितले की, या घोटाळ्यात माझा नातेवाईक असला तरी कोणालाही सोडणार नाही. या प्रकरणात आणखी मोठे चेहरे असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, बनावट वर्क ऑर्डरचा विषय कानावर येताच मी स्वत: मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. त्याचबरोबर पोलिस आयुक्तांना कठोर कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. यातील तनय हा माझा दूरचा नातेवाईक आहे. छत्रपती संभाजीनगर येथील एका ठेकेदाराने काम मिळवण्यासाठी या ठगांना तब्बल 25 लाख रुपये दिले आहेत.






असा रचला 591 कोटींच्या कंत्राटाचा बनाव

1. पाच बनावट टेंडर्स : आरोपी तनय, नरेंद्र महाजन, शकीलने नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे खोटे दस्तऐवज तयार केले.

2. कामांचे स्वरूप : हाउसकीपिंग, पोलिसांना आहार, स्नानासाठीचे साहित्य पुरवणे अशा 5 कामांचा 591 कोटींच्या निविदांचा समावेश होता.

3. ठेकेदारांचा विश्वास बसावा म्हणून विभागीय आयुक्तांची बनावट डिजिटल सही व भारत सरकारची राजमुद्रा असलेल्या वर्क ऑर्डर दिल्या.

कुंभमेळ्याआधीच सुमारे 150 कार्यकर्त्यांचा नाशकात मुक्काम
पुढील वर्षी होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्यात निघणारी कोट्यवधींची कामे मिळवण्यासाठी जामनेरसह जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, भुसावळ, मुक्ताईनगर, धुळे येथील 150 पेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी नाशिक शहरात मुक्काम ठोकला आहे. शासकीय कार्यालये, शासकीय विश्रामगृह, मुंबईतील मंत्रालय येथे या कार्यकर्त्यांच्या झुंडी फिरत असल्याची माहिती कार्यकर्त्यांच्या गोटातून पुढे आली.

दोघांच्या कुटुंबीयांशी माझा संबंध नाही
माझे आरोपींच्या कुटुंबाशी कौटुंबिक संबंध नाहीत. दोघांच्या दारूच्या व्यसनाने त्यांच्या कुटुंबीयांना शेतजमीन विकावी लागलेली आहे. आरोपींवर कठोर कारवाईचे निर्देश मी दिले असल्याचे मंत्री गिरीश महाजन म्हणाले.

एकाकडून 2 कोटी 17 लाख रुपये उकळले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तनय, नरेंद्र, शकीलने एका ठेकेदाराला हाउसकीपिंगचे काम मंजूर करून देण्याचे खोटे आश्वासन देऊन त्याच्याकडून तब्बल दोन कोटी 17 लाख 50 हजार रुपये उकळले.

नाशिकमध्ये तीन स्वतंत्र गुन्हे दाखल
कुंभमेळा प्राधिकरण अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची बनावट डिजिटल सही, भारत सरकारची राजमुद्रा वापरून लूट करणार्‍यांविरुद्ध नाशिकरोड पोलिस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !