गुलाब बनून काट्यांसोबत जगण्यापेक्षा, वाघीण बनून स्वतःचे रक्षण करायला शिका : भुसावळात आरती चौधरी

पु.ओं.नाहाटा महाविद्यालयात ‘आजची युवती : सजग, सुरक्षित आणि सक्षम’ या विषयावर व्याख्यान


भुसावळ (गुरुवार, 20 ऑगस्ट 2026) : गुलाब बनून काट्यांसोबत जगण्यापेक्षा वाघीण बनून स्वतःचे रक्षण करायला शिका, असा ठाम आणि प्रेरणादायी संदेश शहरातील प्रसिद्ध समुपदेशक आरती सारंग चौधरी यांनी येथे दिला. ‘आजची युवती : सजग, सुरक्षित आणि सक्षम’ या विषयावर शहरातील पु.ओं.नाहाटा महाविद्यालयात त्यांनी विद्यार्थिनींना अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या पर्यवेक्षक प्रा. स्वाती पाटील होत्या.

डिजिटल युगात सतर्कता गरजेची
व्याख्यानादरम्यान आरती चौधरी यांनी आजच्या काळात युवतींनी जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर सजगता, सुरक्षितता आणि सक्षमता या तीन महत्त्वपूर्ण सूत्रांचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
सोशल मीडियाचा वापर करताना वैयक्तिक माहिती आणि छायाचित्रे शेअर करण्याबाबत विशेष काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. सोशल मीडियावरील माहिती अथवा छायाचित्रांचा गैरवापर होण्याची शक्यता लक्षात घेऊन विद्यार्थिनींनी डिजिटल सजगता बाळगावी, असे त्यांनी सांगितले. सायबर बुलिंगला बळी न पडता योग्य वेळी मदत घेणे, ऑनलाइन व्यवहार करताना आवश्यक ती खबरदारी घेणे तसेच इंटरनेटवरील वैयक्तिक मर्यादा जपणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हक्कांची जाणीव आणि आरोग्याची काळजीही महत्त्वाची
प्रत्येक महिलेने आपल्या हक्कांशी संबंधित कायद्यांची माहिती करून घेणे गरजेचे असल्याचे सांगताना त्यांनी आरोग्याबाबतही विद्यार्थिनींना जागरूक केले. अनारोग्यदायी खाण्याच्या सवयी टाळून संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि निरोगी जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन त्यांनी केले.

संकटात घाबरू नका, सजगतेने करा सामना
युवतींनी आपल्या परिसरातील संभाव्य धोक्यांची जाणीव ठेवावी, विशेषतः एकट्याने प्रवास करताना किंवा निर्जन परिसरात जाताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे मार्गदर्शन करण्यात आले. अचानक संकट ओढवल्यास घाबरून न जाता प्रसंगावधान राखून सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचा सल्ला त्यांनी दिला. स्वतःच्या मनातील धोक्याबाबतची जाणीव आणि संभाव्य इशारे गांभीर्याने घेण्याचे आवाहन करत त्यांनी ‘रेड फ्लॅग्स’ वेळेवर ओळखा आणि अनावश्यक धोका पत्करू नका, असे स्पष्ट केले.

‘नाही’ म्हणण्याची हिंमत प्रत्येक युवतीत हवी
आपल्याला न पटणारी किंवा अस्वस्थ करणारी कोणतीही गोष्ट स्वीकारण्याची गरज नाही. अशा वेळी स्पष्टपणे ‘नाही’ म्हणण्याची हिंमत आणि आत्मविश्वास प्रत्येक युवतीमध्ये असला पाहिजे, असे आरती चौधरी यांनी सांगितले.

आर्थिक स्वावलंबनावर विशेष भर
युवतींनी कोणावरही पूर्णपणे अवलंबून न राहता स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आर्थिक स्वावलंबन आणि आर्थिक साक्षरतेकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असेही त्यांनी नमूद केले. शिक्षणासोबत आर्थिक नियोजनाचे ज्ञान आणि स्वतःची निर्णयक्षमता विकसित करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

संकटकाळात हेल्पलाईनचा वापर करा
संकटकाळात उपलब्ध असलेल्या अधिकृत आपत्कालीन मदत सेवांचा योग्य वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. महिलांसाठी 1091 आणि आपत्कालीन मदतीसाठी 112 या क्रमांकांची माहिती देताना त्यांनी विद्यार्थिनींनी आपला मोबाईल फोन कार्यरत व आवश्यकतेनुसार चार्ज ठेवण्याचे महत्त्वही अधोरेखित केले.

शिक्षणाचा उपयोग स्वतःच्या प्रगतीसह समाजहितासाठी करा
व्याख्यानाच्या शेवटी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन शिक्षणाचा उपयोग स्वतःच्या प्रगतीसह समाजहितासाठी करण्याचे आवाहन आरती चौधरी यांनी केले. आपल्या पंखांना बळ द्या आणि प्रत्येक परिस्थितीत सजग, सक्षम व आत्मविश्वासपूर्ण राहा, असा संदेश त्यांनी दिला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी विशाखा समितीच्या चेअरमन प्रा.नम्रता महाजन यांनी प्रास्ताविकातून समितीच्या कार्याची माहिती देत व्याख्यानाचा उद्देश स्पष्ट केला. सूत्रसंचालन प्रा.जयश्री येवले तर विशाखा समितीच्या सदस्या डॉ.भाग्यश्री भंगाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापकांसह मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी उपप्राचार्य प्रा. वाय. एम. पाटील तसेच प्राचार्य प्रा.डॉ.बी.एच.बर्‍हाटे यांचे मार्गदर्शन लाभले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !