शिंदखेडा पोलिसांची मोठी कामगिरी : शेतातील विद्युत मोटारी चोरणार्या दोघांना अटक
धुळे (गुरुवार, 20 ऑगस्ट 2026) : शेतातील विहिरींवरील पाण्याच्या मोटारी चोरणार्या दोन आरोपींना शिंदखेडा पोलिसांनी जेरबंद केले आहे. आरोपींकडून 30 हजारांच्या जलपरी (मोटार) सहा एक लाख 88 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
शिंदखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जिभाऊ बाबूराव पाटील यांच्या चिमठावळ गावाच्या शेतातून 15 रोजी मोटार चोरीला गेल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार रोहित संजय तडवी (21) व जयपाल नानाभाऊ गिरासे (25, रा.चिमठावळ, ता.शिंदखेडा) यांना अटक करण्यात आली.
पोलिसांनी आरोपींकडून 30 हजार रुपये किंमतीची मोटार, पाच हजारांचा मोबाईल, तीन हजारांचा मोबाईल तसेच दिड लाखांची रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 बुलेटसह एकूण एक लाख 88 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपअधीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक मयूर भामरे, अंमलदार साबीर शेख, प्रशांत पवार, कमलेश कोठावदे आदींच्या पथकाने केली.


