सरकारच्या नियतीत खोट : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला सुरूवात
आंतरवाली सराटी (शनिवार, 29 ऑगस्ट 2026) : सरकारच्या नियतीत खोट, मराठ्यांचे कल्याण होऊ द्यायचे नाही, असा निर्धार या सरकारने केला असल्याचा हल्लाबोल करीत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारपासून आंतरवाली सराटी येथे उपोषणाला सुरूवात केली.
काय म्हणाले जरांगे पाटील ?
मनोज जरांगे म्हणाले की, दोन महिने, चार महिने करत सरकारने तीन वर्षे वेळकाढूपणा केला. आता आमच्या लक्षात आले आहे की, सरकारच्या नियतीतच खोट आहे. त्यांना मराठ्यांच्या मुलाबाळांचे कल्याणच होऊ द्यायचे नाही. त्यामुळे आता सर्व मागण्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाल्याशिवाय मी इथून उठणार नाही.

प्रदूषणाच्या नोटिशीवरून सरकारला टोला
पोलिसांनी दिलेल्या प्रतिबंधात्मक नोटिशीवर बोलताना जरांगे म्हणाले, वाहतुकीला अडचण होऊ नये म्हणून आम्ही स्वयंसेवक देतोय. यात प्रदूषणाचा उल्लेख असेल, तर गाड्या घेतल्यावर आणि सरकारचे जे काही सुरू आहे त्याने प्रदूषण होत नाही का? शेतकर्यांना, गोरगरीब जनतेला आणि ‘लाडक्या बहिणीं’ना पैसे देणार आहात, त्याने प्रदूषण होत नाही का? हे ’सरकारी प्रदूषण’ आधी थांबवा.
जात पडताळणी समिती कायमची बरखास्त करा
कुणबी नोंदी आणि प्रमाणपत्रांच्या वैधतेवर बोलताना जरांगे यांनी जात पडताळणी प्रक्रियेवर मोठा आक्षेप घेतला. तहसीलदार, एसडीएम किंवा सक्षम अधिकारी सगळे पुरावे तपासूनच कुणबी प्रमाणपत्र देतात, मग पुन्हा जात पडताळणी कशासाठी? देशातील इतर राज्यांमध्ये अशी समिती नाही, मग ती फक्त महाराष्ट्रातच का?
मुद्दामहून मराठा मुलांची अडवणूक
जात पडताळणी अधिकारी जाणुनबुजून मराठा मुलांची अडवणूक करतात. पैसे दिले की त्यांचे ’कीस’ पडत नाहीत, नाही दिले की कागदपत्रांमध्ये मुद्दाम चुका काढल्या जातात. यामुळे लोकांचे हेलपाटे होतात आणि ऍडमिशन्स कॅन्सल होतात. त्यामुळे इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातील ’जात पडताळणी समिती’ कायमची बरखास्त करावी, अशी मोठी मागणी त्यांनी केली. या निर्णयामुळे मराठाच नव्हे तर ओबीसी आणि एसटी प्रवर्गातील गरीब लोकांचेही कल्याण होईल, असे ते म्हणाले.
मराठा समाजाला आवाहन- आपली मुले अधिकारी बनवा
मराठा समाजाला भावनिक साद घालताना जरांगे पाटील म्हणाले, आज प्रशासनात इतर जातींचे अधिकारी बसले आहेत, ज्यांना आपल्याबद्दल द्वेष आहे. अधिकारी हा जात विसरून सर्वांसाठी काम करणारा असावा, पण काही जणांच्या डोक्यात घाणेरडे विचार आहेत. त्यामुळे मराठा समाजाने आता शहाणे व्हावे, आरक्षण मिळवून आपली मुले प्रशासनात अधिकारी बनवा. तरच पुढच्या पिढीचे वाटोळे टळेल.
