वादाच्या भोवर्‍यात सापडलेली ऑनलाईन टंकलेखन परीक्षा अखेर रद्द


मुंबई (शनिवार, 29 ऑगस्ट 2026) : मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने 16 ऑगस्ट रोजी राज्यभरात लिपिक पदासाठी घेण्यात आलेली ऑनलाइन टंकलेखन परीक्षा तांत्रिक बिघाडामुळे वादाच्या भोवर्‍यात सापडली होती. विद्यार्थ्यांचा वाढता रोष आणि आंदोलनाची गंभीर दखल घेत अखेर मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेत 16 ऑगस्ट रोजी झालेली ही ऑनलाइन टंकलेखन चाचणी अधिकृतरीत्या रद्द केली.

विद्यार्थ्यांचा वाढला होता रोष
अनेक ठिकाणी उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देता न आल्याने त्यांच्यात तीव्र संताप निर्माण झाला होता. या प्रकाराविरोधात विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आवाज उठवला. सीजेपीचे अभिजीत दीपके यांनी उमेदवारांसोबत छत्रपती संभाजीनगरात ठिय्या आंदोलन केले तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही या प्रश्नावर प्रशासनाकडे जोरदार पाठपुरावा केला.


लवकरच जाहीर होणार वेळापत्रक
या परीक्षेची नवी तारीख आणि सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल, अशी माहिती उच्च न्यायालयाकडून देण्यात आली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे तांत्रिक अडचणींचा फटका बसलेल्या हजारो उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांना आता परीक्षेची पुन्हा नव्याने संधी मिळणार आहे.

रोहित पवार काय म्हणाले?
उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर आमदार रोहित पवार यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, उच्च न्यायालयाच्या लिपिक भरतीसाठी घेण्यात आलेल्या टायपिंगच्या परीक्षेत मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचं निदर्शनास आल्यानंतर उच्च न्यायालयाचे महानिबंधक मुनगंटे साहेब आणि महाधिवक्ता मिलिंद साठे साहेब यांची भेट घेऊन त्यांच्याकडं संबंधित परीक्षेची टायपिंग टेस्ट रद्द करण्याची विनंती केली होती. त्यानुसार 16 ऑगस्ट रोजी घेण्यात आलेली टायपिंग टेस्ट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबद्दल माननीय न्यायालयीन प्रशासनाचे आभार. झालेल्या परीक्षेतील गैरप्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि नव्याने घेण्यात येणारी टायपिंग टेस्ट स्वतंत्र व पारदर्शक पद्धतीने घेतली जावी, अशी विनंती देखील पवार यांनी केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !