मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान : शिव्या घालणारी लोक विकासकामे झाल्यावर आम्हालाच फुलांचे हार घालतील !
नाशिक (शनिवार, 29 ऑगस्ट 2026) : नाशिकमध्ये विकासकामे सुरू असल्याने नाशिककरांना सध्या मोठा त्रास सोसावा लागत आहे आणि त्यामुळे आम्हाला लोकांच्या शिव्याही खाव्या लागत असून मात्र सर्व कामे पूर्ण झाल्यावर हेच लोक आपल्याला फुलांचे हार घालतील, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी कुंभमेळ्यातील कामांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करणारे काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरही त्यांनी जोरदार पलटवार केला.

तर शिव्या खाण्याची तयारी ठैवा
नाशिकमध्ये आयोजित ‘सिंहस्थ महा कुंभ भक्ती संगम’ कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणाले की, सध्या एकाच वेळी रस्त्यांची कामे, रिंगरोड आणि रुंदीकरण सुरू असल्याने नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या लोकांना त्रास होतोय त्यामुळे लोकांच्या शिव्या आम्हाला खाव्या लागतात. गिरीश महाजन आणि दादा भुसे इथेच राहत असल्याने त्यांना तर जास्त शिव्या खाव्या लागतात.
कोणतेही मोठे परिवर्तन करताना सुरुवातीला शिव्या खाव्याच लागतात. पण ज्या दिवशी ही कामे पूर्ण होतील, त्र्यंबकेश्वरचा कॉरिडॉर उभा राहील, तेव्हा हेच लोक आपल्याला फुलांचे हार घालतील आणि आपली तारीफ करतील त्यामुळे अधिकार्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी दोन शिव्या खायची तयारी ठेवावी फक्त आपले काम जनहिताचे आणि पारदर्शक असले पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
90 टक्के निधी कायमस्वरुपी व्यवस्थेवर खर्च
काही लोक विचारतात की कुंभमेळ्यावर 34 हजार कोटी रुपये का खर्च करताय? त्यांना हे समजत नाही की यातील 90 टक्के निधी हा कायमस्वरूपी व्यवस्थांवर खर्च होत आहे. यातून पुढच्या 50 वर्षांसाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये आधुनिक सुविधा निर्माण होणार आहेत.
साधुग्रामच्या जागांचे अधिग्रहण
दर 12 वर्षांनी कुंभमेळ्यावेळी साधुग्रामसाठी जागांचा प्रश्न निर्माण होतो. जर आता या जागा अधिग्रहित केल्या नाहीत तर भविष्यात कुंभमेळा कुठे करायचा हा प्रश्न उभा राहील म्हणूनच अडीच हजार कोटी रुपये खर्च करून साधुग्रामच्या जागा कायमस्वरूपी अधिग्रहित करण्याचा मोठा निर्णय आम्ही घेतला.
पृथ्वीराज चव्हाणांच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
कुंभमेळ्याच्या कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत पृथ्वीराज चव्हाण यांनी खर्चाचा अहवाल जाहीर करण्याची मागणी केली होती. याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, कुंभमेळ्याचे सर्व प्रकल्प जाहीर आहेत, यात लपवलेले काहीच नाही. सर्व माहिती ‘पब्लिक डोमेन’मध्ये उपलब्ध आहे, त्यांनी ती तपासून पाहावी. ज्यांच्या मनात आणि आचरणात भ्रष्टाचार आहे, त्यांनाच सगळीकडे भ्रष्टाचार दिसतो. ज्या ज्या ठिकाणी सनातन आणि हिंदू आस्था आहे, त्या ठिकाणी असे खोटे आरोप करून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याची काहींची स्ट्रॅटेजी आहे. पण ’ये पब्लिक है, ये सब जानती है’, असा टोला त्यांनी लगावला.
31 ऑक्टोबरला ध्वजारोहण
सिंहस्थ महाकुंभाच्या तयारीचा औपचारिक टप्पा पुढे नेत 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण करण्यात येणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. साधुसंत, आखाडे आणि विविध भक्ती परंपरांच्या सहभागातून हा कुंभमेळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
