महायुतीत असूनही राष्ट्रवादीला ‘सावत्र’ वागणूक? भुसावळच्या आढावा बैठकीत पदाधिकार्‍यांची नाराजी

पालकमंत्री गुलाबराव पाटील व मंत्री गिरीश महाजनांची भेट घेणार


भुसावळ (रविवार, 30 ऑगस्ट 2026) : निवडणुका आल्या की महायुतीचा घटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घ्यायचे आणि इतर वेळी मात्र पक्षाला डावलायचे, अशी भूमिका भाजप व शिवसेनेकडून घेतली जात असल्याची नाराजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रावेर लोकसभा जिल्हा आढावा बैठकीत व्यक्त करण्यात आली. महायुतीतील घटक पक्षाला योग्य तो सन्मान आणि स्थानिक पातळीवर समन्वय मिळावा, अशी मागणीही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रावेर लोकसभा जिल्ह्याची मासिक आढावा बैठक शनिवारी, 29 रोजी येथील भुसावळातील शासकीय विश्रामगृहात जिल्हाध्यक्ष तथा भुसावळचे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.


स्थानिक पदाधिकार्‍यांना आमंत्रीत केले जात नसल्याची खंत
जिल्ह्यात अमळनेर मतदारसंघातून माजी मंत्री अनिल पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार आहेत. जिल्ह्याच्या पूर्व भागातील विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप व शिवसेनेच्या स्थानिक लोकप्रतिनिधींकडून शासकीय कार्यक्रम, बैठका तसेच महायुती सरकारच्या निधीतून मंजूर विकासकामांच्या भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमांमध्ये राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकार्‍यांना आमंत्रित केले जात नसल्याची खंत बैठकीत व्यक्त करण्यात आली.

कार्यकर्त्यांमध्ये वाढला संभ्रम
स्थानिक पातळीवर कोणत्याही प्रकारचा समन्वय साधला जात नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि नाराजी निर्माण होत असल्याचेही पदाधिकार्‍यांनी सांगितले. या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी रावेर लोकसभा जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकार्‍यांचे शिष्टमंडळ राष्ट्रवादीचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांची लवकरच भेट घेणार आहे.

मतदार यादीपासून जिल्हा परिषद निवडणुकीपर्यंत चर्चा
बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसह आगामी निवडणुकांच्या तयारीवर चर्चा करण्यात आली. एसआयआर प्रक्रियेत नव्याने जाहीर होणार्‍या मतदार याद्यांची बूथस्तरावर पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. मतदार यादीतील नावे वगळली गेली असल्यास किंवा अनोळखी नावांचा समावेश असल्यास तक्रारी दाखल करण्यासाठी पक्षाच्या बीएलएंच्या माध्यमातून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. विशेष कार्यकारी दंडाधिकारी या अशासकीय पदांवर पक्षाच्या इच्छुकांची नियुक्ती व्हावी, यासाठी विहित नमुन्यात अर्ज भरून प्रस्ताव तयार करण्याबाबतही चर्चा झाली. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गट व गणनिहाय पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. विविध तालुकाध्यक्षांनी आपापल्या भागातील संघटनात्मक स्थिती आणि निवडणूक तयारीची माहिती बैठकीत दिली.

सकारात्मक निर्णयासाठी पाठपुरावा करणार
जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मांडलेल्या प्रश्नांची प्रदेश पातळीवर दखल घेऊन त्यावर सकारात्मक निर्णयासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली.

ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन
सावदा येथील माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे आणि ज्येष्ठ नेते भगतसिंग पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. रावेरचे उपनगराध्यक्ष असिफ दारा शेख, जिल्हा सरचिटणीस विवेक ठाकरे, ओबीसी जिल्हाध्यक्ष डॉ. सोपान दुट्टे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष कुर्बान शेख, शशिकांत पाटील, राष्ट्रवादी युवकचे अक्षय सोनवणे तसेच युवती जिल्हाध्यक्ष भाग्यश्री ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले.

बैठकीस भुसावळ, रावेर, यावल, मुक्ताईनगर, बोदवड, चोपडा व फैजपूर परिसरातील पक्षाचे पदाधिकारी, विविध आघाड्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !