भुसावळात संत सेना महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा व पुण्यतिथीनिमित्त भव्य धार्मिक उत्सव
आजपासून 8 सप्टेंबरदरम्यान अखंड हरिनाम सप्ताह संगीतमय भागवत कथेसह विविध कार्यक्रम
भुसावळ (मंगळवार, 31 ऑगस्ट 2026) : भुसावळ शहरातील नाभिक संघाच्या वतीने संत शिरोमणी संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा तसेच मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त 1 ते 8 सप्टेंबर 2026 या कालावधीत विविध कार्यक्रम होत आहेत. शहरातील जामनेर रोडवरील प्रिमियर हॉटेल मागील संत सेना महाराज सामाजिक सभागृहात हा उत्सव मोठ्या भक्तिभावात पार पडणार आहे. या उत्सवात अखंड हरिनाम सप्ताह, संगीतमय श्रीमद् भागवत कथा, किर्तन, भजन, पूजन विधी तसेच विविध धार्मिक कार्यक्रम होतील.
आजपासून विविध कार्यक्रम
कार्यक्रमाची सुरुवात मंगळवार, 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता विविध मूर्ती अष्टभुजा देवी मंदिरात आणण्याने होईल. बुधवार, 2 सप्टेंबर रोजी गणेश पूजन व नवग्रह पूजनानंतर सकाळी अष्टभुजा मंदिर ते संत सेना महाराज मंदिर अशी भव्य मिरवणूक निघेल. त्यानंतर मूर्ती स्थापना, कथा, हरीपाठ व कीर्तनाचे कार्यक्रम होतील. गुरुवार, 3 सप्टेंबर रोजी क्षेत्रपाल मंडळ, रुद्र मंडळ व अग्नि स्थापना यांसह पूजा प्रारंभ होईल. कथा, हरीपाठ व प्रवचन सेवा तसेच किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, 4 सप्टेंबर हा सोहळ्यातील प्रमुख दिवस असून याच दिवशी मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा पार पडणार आहे. सायंकाळी किर्तनासह धार्मिक विधी होतील तर विविध संत-महंतांची उपस्थिती असेल. 5 सप्टेंबर रोजी खाटूश्याम भजन, कथा व किर्तन तसेच 6 सप्टेंबरला सुंदरकांड व कीर्तन तर 7 सप्टेंबर रोजी महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम व वेशभूषा स्पर्धा होईल. 8 सप्टेंबर रोजी संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त भजन, दिंडी सोहळा, पालखी पूजन, सत्कार कार्यक्रम, मान्यवरांचे मनोगत तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. याच दिवशी संगीतमय कथा व किर्तनाचा समारोप होणार आहे. कथा निरूपणाची सेवा ह.भ.प. उमेश सनांसे (छोटू महाराज) यांच्याकडून करण्यात येणार आहे.

यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
यशस्वीतेसाठी नाभिक संघाचे अध्यक्ष संजय बोरसे, कार्याध्यक्ष अनिल टोंगे, सामाजिक कार्यकर्ते सचिन सोनवणे, किन्हीच्या सरपंच निलम सोनवणे, महिला कार्यकारिणी अध्यक्षा चित्रा सोनवणे, नाभिक संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणावर सहकार्य करीत आहेत.
