महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय : ओरिजनल पैठणीची ओळख पटण्यासाठी साडीवर येणार बारकोड
पंढरपूर (मंगळवार, 1 सप्टेंबर 2026) राज्याच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. ओरिजनल पैठणीची ग्राहकांना ओळख पटण्यासाठी आता पैठणीवर बारकोड येणार आहे. आता सेमी पैठणी आणि ओरिजनल पैठणीतील फरक स्पष्ट या बारकोडच्या माध्यमातून होणार आहे. राज्याचे स्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी मंत्री सावकारे आले असता त्यांनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे देत असताना ही घोषणा केली आहे.
बनावठ पैठणी विक्रीला बसणार चाप
महाराष्ट्राची ओळख असलेल्या पैठणीबाबत राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक महिलेला आपल्या कपाटात एकतरी पैठणी हवी अशी इच्छा असते त्यामुळं पैठणी खरेदी करताना त्या अत्यंत जागरूक असतात. बाजारात ओरिजनल पैठणीच्या ऐवजी सेमी पैठणी किंवा डुप्लीकेट पैठणीदेखील विकली जाते मात्र आता बनावट पैठणीच्या विक्रीला चाप बसणार आहे. राज्य सरकारने त्यासंदर्भात पावलं उचलली आहे.

काय म्हणाले मंत्री सावकारे ?
ग्राहकांना खरी पैठणी ओळखता यावी त्यासाठी एक बारकोड आणि लोगो बनवण्याचा प्रयत्न वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून सुरू असल्याची माहिती राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी दिली आहे. खर्या पैठणीची ओळख होण्यासाठी बारकोडच्या माध्यमातून कोणता धागा वापरलाय कोणत्या गावात कोणत्या कारागीरांनी ही पैठणी तयार केली आहे याची माहिती ग्राहकांना उपलब्ध होणार आहे त्यामुळे बनावट पैठणी ओळखता येणार आहे.
पैठणी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा भाग आहे असून पैठणीला मागणी खूप आहे. तो एक कलेचा भाग आहे. एक पैठणी तयार करायला 15 ते 30 दिवस एवढा कालावधी कारागीरांना लागतो. पैठणीचे उत्पादन वाढवण्यासाठी कामगारांची संख्या वाढवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सुद्धा विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. पैठणी विक्रीसाठी वस्त्रोद्योग विभागाच्या माध्यमातून आम्ही प्रदर्शन भरवत असतो त्यामधून सुद्धा पैठणी खरेदीसाठी चांगली मागणी आहे, असेदेखील मंत्री संजय सावकारे म्हणाले.

